रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर परिसरातील पशुपालक शेतकरी कडब्याच्या गंजी लावण्यात व्यस्त झाले आहेत. रहिमतपूरसह परिसरातील सर्व गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गायी व म्हैशींचे पालन केले जाते.
काही वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे अनेक दुधाळ जनावरे असायचीच; परंतु अलीकडच्या काळात पूर्वीच्या काळापेक्षा काही प्रमाणात जनावरांची संख्या कमी झाली आहे. दुधाला दर कमी असल्यामुळे जनावरे पाळण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करू लागला आहे. दरम्यान, अनेक युवक जातिवंत दुधाळ जनावरांचा आपल्या गोठ्यामध्ये भरणा करून एक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे वळत असल्याचे दिसत दिसून येत आहे. शासनाकडूनही गाई, म्हशी व शेळी पाळण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. याचा फायदा अनेक शेतकरी उचलत आहेत.
जनावरांच्या वर्षभराच्या चाऱ्याची तजवीज करण्यासाठी ज्वारीच्या कडब्याचा भरणा करणे अत्यंत गरजेचे असते. सध्या रहिमतपूर परिसरातील गावांमधील ज्वारीची काढणी, मळणी व कडब्याची बांधणी पूर्ण झाली आहे. वर्षभराच्या चाऱ्याची साठवणूक करण्यासाठी शेतकरी गंजी लावण्याच्या कामात व्यस्त झाला आहे. वैरणीची उंंची व पेंढीची बांधणी बघून प्रतिशेकडा एक हजार रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. गतवर्षापेक्षा यावर्षी कडब्याचा दर खाली उतरला असल्याची माहिती पशुपालकांनी दिली.
फोटो :
रहिमतपूर (ता. कोरेगाव) परिसरात कडब्याच्या गंजी लावण्याच्या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत. (छाया : जयदीप जाधव)