ऑनलाइन लोकमत
पाटण (सातारा), दि. 07 - तालुका दुर्गम, अनेक गावे डोंगरात वसलेली. अडचणींचा आणि इतर तालुक्यांच्या तुलनेत मागासलेला अशी पाटणची अवस्था. येथे अधिकारी येण्यास नाक मुरडतात, त्यामुळे आज बरेचसे शासकीय विभाग चार्जवर असून, लोकांची कामे रखडली आहेत. २४१ गावे आणि ४४८ वाड्या-वस्त्यांनी विखुरलेला पाटण तालुका ढेबेवाडी, तारळे, कोयना, चाफळ आणि मणदुरे अशा विभागांतील लोक कोसोदूर पायपीट आणि प्रवास करून पाटणला येतात; पण पुढे काय तर शासकीय अधिकारी खुर्चीवर दिसत नाहीत. याबाबत विचारले तर अधिकारी आठवड्यातून एकदा येतात. यामध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी विभाग, सहायक निबंधक, मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्र आणि पशुवैद्यकीय विभाग अशा जनतेच्या निगडीत असणाºया कार्यालयांतील अधिकारी चार्ज सांभाळत आहेत. मग काय आठवड्यातून एकदाच पाटणसाठी वेळ दिला जातो. क-हाड, वडूज, सातारा येथील अधिकारी पाटणचा चार्ज सांभाळत आहेत. अनेक महिन्यांच्या काळानंतरसुद्धा अशीही अवस्था आहे.
आमदारांच्या भूमिकेकडे नजर...
पाटणचे आमदार शंभूराज देसाई सध्या अधिवेशनात आहेत. त्यांनी पाटण तालुक्यातील अधिका-यांच्या रिक्त जागा भरण्याबाबत आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे. आमदारांना याविषयीची कल्पना आहेच.
सहायक निबंधक कार्यालयात सामसूम...
पतसंस्था आणि सोसायट्या यांच्या निवडणुका आणि त्यांचा कारभार सहायक निबंधक कार्यालयामार्फत नियंत्रण केले जाते. मात्र, या कार्यालयास कोणी वाली नसल्यासारखी स्थिती आहे. लोकांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. चोपडी सोसायटीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा गुन्हा नोंद झाला. याबाबत आमदारांकडे बैठकीत तक्रारी झाल्या, त्यावेळी सहायक कार्यालयाचा कार्यभार असणारे अधिकारी उमरदंड पाटणला नव्हते, याबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
कृषी योजनांचा बोजवारा...
शेतक-यांचा आत्मा असलेला तालुका आणि पंचायत समिती कृषी विभागाला वर्षांपूर्वीपासून अधिकारी नाहीत, त्यामुळे शेतक-यांना योजनांचा फायदा मिळेना. कृषी पर्यवेक्षक आणि मंडलाधिकारी दुपारीच घरी पळताना दिसताहेत. काळोली येथील कार्यालयास अवकळा आली आहे.
पोलिस उपविभाग कधी बंद कधी चालू..
उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी दीर्घ रजेवर गेल्यामुळे या कार्यालयाचे पोलिस व पोलिस ठाणे यांचा सतत आढावा घेतला जात नाही. एखादी मोठी घटना घडली तरच क-हाडचे अधिकारी पाटणला येतात, अन्यथा इतर दिवशी कधी-कधी पाटणचे उपविभागीय कार्यालय कुलूपबंद असते.