पाटण : येथील श्रीमंत नागोजीराव पाटणकर स्मारक वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने रविवार, दि. १६ रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघ व सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन व पुरस्कार प्रदान समारंभ तसेच सोमवारी, दि.१७ जिल्हा परिषद व वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कुमार साहित्य व कवी संम्मेलनाचे आयोजन येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
यावेळी ग्रंथप्रेमी नागरिकांसह साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर व वाचनालयाचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर यांनी केले आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या अधिवेशनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरणप्रसंगी सागर देशपांडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सनबिम शिक्षण समूहाचे अध्यक्ष सारंग पाटील, नगराध्यक्षा सुषमा महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी जिल्हा शिक्षण परिषद, कुमार साहित्य व कवी संमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या हस्ते होत असून, यावेळी ज्येष्ठ बालसाहित्यकार सुभाष कवडे, विज्ञान प्रसारक डॉ. संजय पुजारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पंचायत समिती सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी हणमंतराव जाधव, गटशिक्षणाधिकारी आर. पी. निकम, नगराध्यक्षा सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित राहणार आहेत.