पाटण/ मणदुरे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे दि. १० जानेवारी रोजी पाटण दौऱ्यावर येत असून, त्यानिमित्ताने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. शरद पवारांच्या आगमनामुळे पाटणकर गट चार्ज होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या २६ वर्षांच्या अखंड राजकीय वाटचालीत मोलाचे सल्ले देणारे आणि पाटणकरांचे निष्ठावान नेते म्हणून शरद पवारांना संपूर्ण पाटण तालुका जाणतो. शरद पवार यांच्या कानमंत्रामुळे विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्यावर अपराजित पकड ठेवली होती. बांधकाम मंत्रिपदाची माळ शरद पवार यांच्यामुळेच विक्रमसिंह पाटणकरांच्या गळ्यात पडली होती. सध्या विधानसभेच्या पराभवानंतर पाटणकर गटास चालना कोण देऊ शकेल? तर ते म्हणजे शरद पवारच. त्यामुळे पाटणचा पवार यांचा दौरा चैतन्य वाढविणारा ठरणार आहे. दि. १० च्या शेतकरी मेळाव्यास तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील पाटणकर प्रेमी असंख्य प्रमाणात एकत्र येणार असे दिसत आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री जयंत पाटील तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या २६ वर्षांच्या विधीमंडळ काळातील पाटण तालुक्याचा विकासाचा सुवर्णकाळ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. (प्रतिनिधी)पाटणकरांच्या निवासस्थानी शरद पवाररविवार दि. १० रोजी शरद पवार हे सकाळी १० वाजता माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या निवासस्थानी दाखल होतील. तिथे आदरातिथ्य झाल्यानंतर पाटण येथे शेतकरी मेळावा होणार आहे. पाटणचा हा दौरा पाटणकर गटाच्या वाटचालीसाठी सुवर्णयोग ठरेल असे सांगण्यात येत आहे.विद्यमान आमदारांचे दौऱ्याकडे लक्ष शरद पवार जातील तिथे राजकीय उलथा-पालथ होते. त्यामुळे भले-भले राजकारणी त्यांच्या दौऱ्यावर विचारमंथन सुरू करतात. त्याचाच एक भाग पाटण दौऱ्याचा ठरेल. कारण विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनी पवारांच्या सभेमुळे आपण थोड्या मतांनी पराभूत झाल्याचा उल्लेख अनेक वेळा आपल्या भाषणात केला आहे. त्यांचे याकडे लक्ष असेल.
पवारांच्या स्वागतासाठी पाटणकर गट आतुर
By admin | Published: January 07, 2016 10:47 PM