पाटण : तालुक्यातील जंगलात राहणाऱ्या जनतेच्या काय हालअपेष्टा आहेत. वन्यप्राणी व वनकायद्याचा फास कसा आवळला जातोय, याचा वस्तुस्थितीदर्शक लेखाजोखा ‘लोकमत’ने ‘सेव्ह द टायगर; पण माणूसही वाचवा’ या वृत्तमालिकेतून मांडला. त्यामुळे पाटणचे आजी-माजी आमदारांनी दरवेळची मतभिन्नता, श्रेयवादातून टोकांचे भांडण विसरुन व्याघ्रप्रकल्पबाधित जनतेच्या बाजूने मत व्यक्त करू लागले आहेत.ढेबेवाडी, कोयना, मोरगिरी विभागातील डोंगरपठारावर वसलेल्या गावांमधील लोकांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनच्या जाचक अटींचा कसा त्रास होतो, वन्यप्राण्यांमुळे त्यांच्या काय वेळ आली आहे. भविष्यात येथील जनतेवर कशी बंधने येणार आहेत. याबाबत सलग सहा दिवस सचित्र वार्तांकन केले होते. या वृत्तमालिकेनंतर प्रशासन व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जनजागृती झाली. त्यानंतर तातडीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. आमदार शंभूराज देसाई यांनीसुद्धा पाटणच्या जनतेला जाचक अटीतून मुक्त करा असेच विचार व्यक्त केले. तत्पूर्वी माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांची भूमिकाही बाधित जनतेच्या बाजूने राहिली आहेत. त्यामुळे आता आजी-माजी आमदार व्याघ्र प्रकल्पबाधीत जनतेच्या बाजूने राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)व्याघ्र प्रकल्प बाधित जनतेच्या मानगुटीवर जाचक अटी लादल्या जात आहेत. या समस्या पाटणच्या दोन्ही नेत्यांना जाणवू लागल्या आहेत. दोन्ही नेत्यांचे याबाबत एकमत पुढे येत असल्यामुळे आता पाटणच्या जनतेची जाचक अटी व बंधनातून सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.- दशरथ झोरे, ग्रामस्थ, मु. पो. मळ-कोळणे, व्याघ्र प्रकल्पबाधित
पाटणचे आजी-माजी आमदार व्याघ्रबाधित जनतेच्या बाजूने
By admin | Published: September 20, 2015 8:59 PM