सातारा : तब्बल पन्नास फुटावर क्रेनवर लटकून जीव धोक्यात घालून विज वितरणचे कर्मचारी शहरात एलईडी दिवे लावत असून या अजब कामाची गजब चर्चा सुरू आहे. या आगळ्या वेगळ्या दुरूस्तीच्या कामाबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. संपूर्ण सातारा शहरात पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्याचा ठेका पालिकेने दिला आहे. शहराच्या काही भागात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही भागामध्ये हे दिवे लावण्याचे काम सुरू आहे. परंतु खासगी ठेकेदाराला दिलेले हे काम संबंधित ठेकेदार म्हणे कामगारामार्फत करून घेत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. हे कामगारही कसलीही खबरदारी न घेता वाटेल तसे क्रेनवर लटकून पथदिवे बसविण्याचे काम करत आहेत. सुरक्षा बेल्टही लावत नाही. विद्यूत प्रवाहाशी एखादी चूक अंगलट येण्याची शक्यता असते. या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी) काय करणार पर्यायच नाही.. पन्नास फुटावर क्रेनवर बसून एलईडी दिवे लावले जातात. काही वेळेला आमच्या पुढे पर्याय नसतो. काम तर केलेच पाहिजे, असे हताश होऊन एका कामगाराने आपल्या भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. एकदा खांबावर दुरूस्ती करत असताना अचानक भोवळ आली. मात्र अशा परिस्थितीतही मी डगमगलो नाही. क्रेनच्या रॉडला मी घट्ट पकडून ठेवलं होतं. त्यामुळे माझाला जीव वाचला, अशी थरारक घटनाही या कामगाराने कथन केली.
पन्नास फुटांवर लटकून पथदिव्यांची दुरुस्ती
By admin | Published: October 17, 2016 12:47 AM