सातारा : दुष्काळी भागातील गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या चळवळीत शाळकरी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, ते दररोज नित्यनियमाने श्रमदान करून ते शिवारात जलसाक्षरतेचे धडे गिरवत आहे.राज्यातील दुष्काळी तालुक्यात नेहमीच पाणी टंचाई आणि जनावारांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यंदा तर भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांनी पायपीट करावी लागत आहे. तसेच टँकरचे पाणी मिळवण्यासाठी डोकी फोडावी लागत आहेत. पाण्यासाठी महिला आणि लहान मुलांना जुंपले जाते.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाला हरविण्यासाठी गावोगावी जलसंधारणाची चळवळ सुरू आहे. गाव पाणीदार करण्याच्या जिद्दीने अनेक गाव पेटून उठली आहेत. टँकरचे पाणी मिळवण्यासाठी रात्र-रात्र जागून काढल्यानंतरही दररोज पहाटे अनेकजण गावाच्या शिवारात श्रमदान करत आहेत. यामध्ये शाळकरी मुलांची संख्या लक्षणीय आहे.
सध्या शाळांना उन्हाळ्याची सुटी असल्याने जलसंधारणाच्या चळवळीमुळे अनेक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत. ते हाती टिकाव, खोरे आणि पाटी घेऊन श्रमदान करीत आहेत. त्यांचा उत्साह पाहून इतरांना बळ मिळत आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.खाऊचा वाटा गावासाठीया चळवळीमध्ये लहान मुलांनी तन आणि मनाने सहभाग तर नोंदवलाच आहे. त्याचबरोबर काही गावांमध्ये तर स्वत:कडे साठवणीत ठेवलेले पैसे या विद्यार्थ्यांनी जलसंधारणासाठी दिले. तर एका मुलीने शिष्यवृत्तीची रक्कम डिझेलसाठी दिली.
पाणी फाउंडेशनच्या चळवळीमुळे विद्यार्थ्यांचे मनसंधारण होत आहेत. गावात प्रभात फेरी काढणे, घोषणा देणे आदी उपक्रमांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग तर असतोच. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुटीत परगावी जाऊन आनंद लुटण्यापेक्षा मुलं गावातच श्रमदान करीत आहेत. हीच खरी काळाची गरज आहे.-माधुरी ढाणे, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा
जलसंधारणाच्या या चळवळीमध्ये सुरुवातीपासून लहान मुलांचे मोलाचे योगदान आहे. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व कळाले. प्रत्येक उपक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत.- बाळासाहेब शिंदे, जिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशनआसनगाव, ता. कोरेगाव येथे सुरू असलेल्या श्रमदानाच्या कामात मुलांनी सहभाग नोंदवला.