सातारा
कोरोना बाधित आणि ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन मुबलक असल्याच्या कितीही बाता मारल्या जात असल्या तरी वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यामुळे किती जणांना प्राण गमवावा लागेल या भितीने डॉक्टरांचीही गाळण उडतेय. त्यामुळे दवाखान्यात पेशंट ऑक्सिजनवर असला तरी एवढ्या रुग्णांची जबाबदारी कशी पेलायच्या या चिंतेने डॉक्टर गँसवर राहत आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यात एकूण ६५ रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. यामद्ये १८ सरकारी रुग्णालये आणि ४८ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. मात्र, रुग्ण बाधित झाला तरी तो रुग्णालयात दाखल होत नाही. पहिले काही दिवस होम क्वारंटाईन होण्याचा पर्याय स्विकारला जातो. त्यानंतर जास्त त्रास होऊ लागला तर रुग्णालयात दाखल होतो. हीच सर्वात धोकादायक स्थिती आहे. अंगावर दुखणे काढण्यासारखा हा आजार नाही. हे अनेकदा सांगून लोकांना कळत नाही. कधी आर्थिक अडचण तर कधी घरी बघायला कोणीच नाही यामुळे हा निर्णय घेतला जात असला तरी तो वैयक्तिक आणि इतरांसाठीही धोकादायक ठरु शकतो. घरीच त्रास सुरु झाल्यानंतर मग रुग्णालयात दाखल केले जाते. तोपर्यंत रुग्णाला श्वास घेण्यास अडचणी निर्माण झालेल्या असतात. ऑक्सिजनची गरज असते. सध्या असे अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, ऑक्सिजनच्या कमरतेमुळे त्यांना दाखल करुन घेण्यास रुग्णालयाकडून नकार मिळत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे ऑक्सिजनची कमतरता.
सरकारी यंत्रणेकडून ऑक्सिजनची कोणतीही कमतरता नाही असे सांगितले जात असले तरी देखील प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाचा जीव टांगणीला लागलेला असताना डॉक्टरांनाही ऑक्सिजनची मोठी चिंता सतावत आहे. मोठ्या हॉस्पिटलचे ऑक्सिजनचे प्लांट आहेत. मात्र, छोट्या रुग्णालयांना इतरांवर अवलंबून रहावे लागत आहे. रुग्णासाठी रात्रंदिवस राबायचे आणि ऑक्सिजन नाही म्हणून रुग्ण दगावल्यास नातेवाईकांचा रोष ओढावून घ्यायचा यापेक्षा रुग्ण दाखल करुनच न घेतलेला बरा अशी रुग्णालयातील डॉक्टरांचीही मानसिकता झाली आहे. त्यामुळे अनेकांना बेड नाहीत म्हणून नाईलाजास्तव घरीच थांबावे लागत आहे. आत्तापर्यंत होम आयसोलेशनमधील सुमारे २८ जणांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. एकाबाजूला कुटुंबाची काळजी आणि दुसऱ्या बाजुला रुग्णालयात बेड मिळेना अशा स्थितीत रुग्ण आहेत.
चौकट
रुग्णांच्या काळजीने डॉक्टरांची उलाघाल
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची काळजी घ्यायची की त्यांच्यासाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या मागे लागायचे याबाबत डॉक्टरांची अडचण होत आहे. गेले कित्येक दिवस ही तारेवरची कसरत करत डॉक्टर आपले काम करत असताना त्यांना प्रशासनाचीही तेवढीच मदत होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने नेमलेल्या खासगी कंत्राटदारांकडून ऑक्सिजनचा योग्य पुरवठा झाला तर डॉक्टरांच्या मनावरील मोठे ओझे हलके होईल. त्यांना त्यांच्या कामावर लक्ष देता येईल.
चौकट
रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीही होतायत बाधित
कोरोना बाधित रुग्णाजवळ कोणालाच जाऊ दिले जात नाही. त्याची सर्व काळजी ही डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर स्टाफलाच घ्यावी लागते. काही कुटुंबांमध्ये तर संपूर्ण कुटुंबच बाधित झाल्याचे आढळून आले आहे. अशावेळी कोणी नातेवाईकही जवळ नसतात. त्यांना औषधे आणून देण्यापासून ते त्यांच्या सर्व चाचण्या करण्यापर्यंतची जबाबदारी डॉक्टरांनाच घ्यावी लागत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीही बाधित झाले आहेत. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर सर्व कसरत करावी लागत आहे.
चौकट
सध्या ऑक्सिजनचा होत असलेला पुरवठा -
जिल्ह्याला ऑक्सिजनची असलेली गरज -
भविष्यात लागणऱ्या ऑक्सिजनचे नियोजन -