खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. एरव्ही राजकारणापासून दूर असलेल्या महिलांवर निवडणूक आरक्षणामुळे उमेदवारीची जबाबदारी पडली असली असून, प्रचाराच्या रणधुमाळीत त्या काहीशा पिछाडीवर दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराची जबाबदारी पतिराजांच्या खांद्यावर पडली आहे. खंडाळा नगरपंचायतीत सतरा जागांसाठी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यासाठी २५ महिला निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग दोन ते आठ आणि पंधरा व सोळा या प्रभागांतील लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. इतरवेळी पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढणाऱ्या पत्नीसाठी पतीने योगदान देण्याची वेळ आली आहे. महिलांना उमेदवारी मिळाली असली तरी त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरातीलच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रतिष्ठेची लढाई केली आहे. पत्नीच्या विजयाचा चंग बांधून मतदारांच्या घराचा उंबरा पतीकडून झिजविला जात आहे. स्वत:च्या सामाजिक कर्तृत्वाचा पाढा वाचण्याबरोबरच पत्नीच्या जिव्हाळ्याची आणि प्रेमळ स्वभावाची आठवण मतदारांपुढे करून दिली जात आहे. याचा फायदाही होताना पाहायला मिळत आहे.पत्नीसाठी पतीची चाललेली कसरत वाखाणण्याजोगी दिसत आहे. खंडाळ्यातील महिला उमेदवारांपैकी काँग्रेसकडून रोहिणी गाढवे, धनश्री जाधव, कल्पना गाढवे, संगीता राऊत, वैजयंता भोसले, जयश्री जाधव, हेमलता ठोंबरे, लता आवटे, दीपाली चव्हाण या निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांना राष्ट्रवादीकडून शोभा गाढवे, सुप्रिया वळकुंदे, शारदा खंडागळे, उज्ज्वला गाढवे, उज्ज्वला संपकाळ, नंदा गायकवाड, लताबाई नरुटे, वनिता संकपाळ, सुप्रिया गुरव यांनी आव्हान दिले आहे. भाजपकडून स्वाती खंडागळे, वनिता शिर्के, राजलक्ष्मी पाटील, वनिता गजफोडे, विजया संकपाळ, शिवसेनेकडून अश्विनी शिंदे या एकमेव निवडणूक लढवत आहेत.महिला उमेदवारी गळ्यात पडल्याने सुरुवातीला नाक मुरडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता काहीही झाले तरी नाव राखायचं असा निर्धार करून रणांगण तापायला सुरुवात केली आहे. पतीच्या प्रत्येक घरातून वैयक्तिक गाठीभेटी सुरू आहेत. विरोधातील असल्या तरी मैत्रिणींना मतांची गळ घातली जात आहे. त्यामुळे राजकारण श्रेष्ठ ठरणार की मैत्री याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)पैसा झाला मोठानिवडणूक म्हटलं की, सर्रास पैशांचा पाऊस पडतो, असं म्हणतात. मात्र, पाचशे, हजारांच्या नोटा बंदीमुळे उमेदवारांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मतदारांच्या अडचणीसाठी पैशांची मदत करता येत नसल्याने पंचाईत झाली आहे. यानिमित्ताने शेवटी पैसा मोठाच असल्याचे समोर आले आहे. यावरही मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शोधल्या जात आहेत.
पतिराजाची वरात मतदारांच्या दारात..!
By admin | Published: November 17, 2016 10:22 PM