सातारा : अवकाळी पावसाचा मोठा फटका भाजी मंडईतही बसला आहे. जोरदार पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांचा माल ओला होऊन कुजला. काहीनी तर डोळ्यात पाणी आणून हा माल कचरा कुंडीत टाकला. पावसात ‘स्वाइन फ्लू’चा प्रसार वेगाने होतो, हे ज्ञात असल्याने अनेक सातारकरांनी घरात थांबणे पसंत केले. त्यामुळे भाजी मंडईत, ग्राहक घरात आणि पाणी डोळ्यात असे दिसले.या तडाख्यात फटका बसला तो टोमॅटो आणि कोबी या दोन भाज्यांना. १५ रुपये किलो असणारे टोमॅटो, कोबी आज चक्क पाच रुपये किलो विक्रीस होता. या तुलनेत दोडका, ढोबी आणि शेवग्याची शेंग यांचे दर स्थिर होते. भविष्यात कांद्याचे दर अधिक चढे होणार असे व्यापाऱ्यांनी सांगितले.मंडईत ग्राहक न येण्यामागे ‘स्वाइन फ्लू’चा प्रसार हेही कारण वर्तविले जात आहे. भाजी नको अन् आजारही ही मानसिकता आहे. व्यापारी जिद्द न सोडता ग्राहकांच्या प्रतीक्षेत मंडईत आहे. (प्रतिनिधी)स्वाइन फ्लूची धास्ती..गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यातच या अवकाळी पावसामुळे हे विषाणू अधिक तीव्रपणे वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत. अशावेळी मंडईतील भाजी खायला नाही मिळाली तरी चालेल; पण मंडईत जाऊन आजारपण नको, अशी मानसिकता ग्राहकांची झाली आहे. त्यामुळे आठवडा बाजार असूनही रविवारी मंडईत शुकशुकाट होता.
पावसानं भाजी अन् स्वाईननं मंडई काळवंडली !
By admin | Published: March 02, 2015 11:33 PM