सातारा : ‘मराठा समाजाची दयनीय अवस्था लक्षात घेऊन आपण समाजाला न्याय मिळवून द्याल. मराठा तरुण-तरुणी समस्यांबाबत विचारणा करत आहेत. आपणच यातून मार्ग काढावा, महाराष्ट्र सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे दिल्लीत केली.
उदयनराजेंनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मराठा समाज हा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे खूप मोठा संघर्ष करत आहे. तरीही त्याच्या पदरात आजपर्यंत काहीच पडले नाही. मराठा समाजाची आरक्षणाची वैध मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने न्या. गायकवाड आयोगाची स्थापना केली. या आयोगाने खेडोपाडी, शहरांमधून मराठा समाजाच्या संबंधित जास्तीत जास्त आणि पुरावे जमा केले. तसेच अतिशय शास्त्रशुद्ध माहिती जमा केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबर २०२० च्या आदेशानुसार राज्य सरकार हा कायदा टिकवून ठेवण्यात असमर्थ ठरलेले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी ठोस पावले उचलायला हवी होती तशी कोणतीही कार्यवाही सरकारने केली नाही. या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी कार्यवाही केली तीसुद्धा सदोष होती. कारण या कायद्याला मिळालेली स्थगिती उठवायची असेल तर त्या आदेशाच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला हवी होती
चौकट...
मराठा समाजात खदखद
राज्य सरकारच्या दिरंगाईबाबत मराठा समाजात खदखद वेगवेगळ्या रूपाने बाहेर येताना दिसत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कि, या प्रकरणात तुम्ही स्वत: जातीनिशी लक्ष घालावे. तसेच मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये. तशा सक्त सूचना राज्य सरकारला देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.
फोटो नेम : ११उदयनराजे
फोटो ओळ : दिल्ली येथे गुरुवारी खासदार शरद पवार यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.