सातारा : रयत शिक्षण संस्थेतील हंगामी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात खासदार शरद पवार व खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यस्थी केली. रविवारी विश्रामगृहावर दोन तासाच्या चर्चेनंतर हंगामी शिक्षकांनी आपले उपोषण मागे घेतले. रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित व अनुदानित पार्टटाईम शिक्षक सेवक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अल्पशा मानधनावर गेल्या ५ ते १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना सेवेत रुजू करून घेण्याबाबत संस्था निर्णय घेत नसल्याने या हंगामी शिक्षकांनी रयत विनाअनुदानित कृती समितीच्या माध्यमातून सातारा येथे रयत शिक्षण संस्थेसमोर उपोषण सुरू केले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता. रविवारी जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या खासदार शरद पवार यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी विश्रामगृहावर भेट घेतली. शिक्षकांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी पवारांकडे केली. या चर्चेमध्ये रयत विनाअनुदानित कृती समितीचे शिष्टमंडळ, रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, डॉ. एन. डी. पाटील, सचिव डॉ. गणेश ठाकूर यांनीही सहभाग घेतला. खासदार शरद पवार यांनी या प्रश्नाबाबत संस्थेकडे विचारणा केली. हंगामी शिक्षकांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी शासनाची मान्यता घ्यावी लागेल. शासनाने मान्यता दिल्यास संस्थेची कोणतीच हरकत नाही, असे स्पष्टीकरण संस्थेच्या वतीने करण्यात आले. शरद पवार यांनी संस्थेत किती पदे रिक्त आहेत? याचीही माहिती घेतली. शासनपातळीवर निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन त्यांच्याशी हंगामी शिक्षकांच्या प्रश्नी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन शिक्षकांनी उपोषण सोडले. (प्रतिनिधी)मंगळवारी मुंबईत बैठकरयत शिक्षण संस्थेतील हंगामी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी खासदार शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले तसेच रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजते. दरम्यान, या बैठकीतील निर्णयानंतर रयत शिक्षक कृती समिती पुढील धोरण ठरवेल, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष अमोल ठोंबरे यांनी दिली.
पवार-उदयनराजेंची रयतप्रकरणी मध्यस्थी
By admin | Published: May 09, 2016 12:11 AM