कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील पवारवाडी (तारूख) येथील ओढ्यावरील फरशी पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने गावाचा संपर्क तुटला होता. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असून, फरशी पुलाला संरक्षक लोखंडी गज बसविण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाड - पाटण तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या तारूखसह सातवाड्यांचा डोंगरी भागात समावेश होत असल्याने येथे पावसाचे प्रमाण मोठे आहे. याच डोंगर पायथ्याशी बारमाही पाणीसाठा असलेला वानरवाडी येथील पाझर तलाव आहे. या तलावातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तलावाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. याच तलावाचा मुख्य ओढा ओलांडून पवारवाडी येथे जावे लागले.
या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने व ओढ्यावरील फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात सतत पूल पाण्याखाली जात असल्याने गावकऱ्यांना शेतातही जाता येत नाही. या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने पुलावरून ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. या अवस्थेत दोराच्या साह्याने लोकांचे येणे-जाणे सुरू असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.
चौकट :
पवारवाडी डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. ओढ्याच्या पलीकडे गाव असले तरी जनावरांना चरण्यासाठी व शेतात जाण्यासाठी या पुलावरूनच यावे लागते. या पुलावरून दैनंदिन रहदारी केल्याशिवाय ग्रामस्थांना अन्य पर्याय नाही.