सातारा : सातारा जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी अद्यापही गळीत हंगाम २०२०-२१ संपूर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी सातारा शेतकरी विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या काळामध्ये सामान्य लोकांच्या नोकरी तसेच व्यवसायावर गदा आलेली आहे. त्यामुळे सर्व जनता आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे घरगुती वीजबिल शेतीपंप वीजबिल, शैक्षणिक फी, बँक कर्जवसुली त्वरित थांबवण्यात यावी जर गावागावांतील वीजबिल भरण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर सर्वसामान्यांची सक्तीची वसुली काय सुरू आहे.
येत्या आठ दिवसांमध्ये प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला नाही तर सातारा शेतकरी विकास आघाडी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शंकर शिंदे, मधुकर जाधव, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, अलाउद्दीन इनामदार, ज्योतिराम झांजुर्णे यांची उपस्थिती होती.