सातारा : गाईच्या दुधाला ३४ रुपये भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातही अखिल भारतीय किसान सभा व कामगार कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील २२ गावात दूध संकलन केंद्रावर दगडाला दुधाचा अभिषेक घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.याबाबत माहिती अशी की, अखिल भारतीय किसान सभा व कामगार कृती समितीच्या वतीने २७ नोव्हेंबर पासून गाईच्या दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्रभर धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील खटाव, कोरेगाव, सातारा, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील २२ गावांमध्ये दूध संकलन केंद्रावर दगडाला दुधाचा अभिषेक घालून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी गाईच्या दुधाला ३४ रुपये भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर मागणी मंजूर होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तर याचवेळी अवकाळी पाऊस व दुष्काळ याबाबतही शेतकऱ्यांमध्ये प्रचार करण्याचा निर्धार करण्यात आला. या मोहिमेमध्ये माणिक अवघडे, पांडुरंग देशमुख, अमर राजे, संजय रैनात आदींनी पुढाकार घेतला. तसेच संबंधितांनी शेतकऱ्यांत जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Satara: गाईच्या दुधाला ३४ रुपये दर द्या, दूध संकलन केंद्रावर दगडाला दुधाचा अभिषेक घालून शासनाच्या धोरणाचा निषेध
By नितीन काळेल | Published: November 29, 2023 6:10 PM