सातारा : ‘राष्ट्रसंत भय्यू महाराज हे धार्मिक, आध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकल जणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. मात्र ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे महान सामाजिक कार्य, आदर्श विचार आपल्यात कायमच राहतील. त्यांचे विचार व सामाजिक कार्य अधिक गतीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा माने-कदम यांनी केले.
भय्यू महाराज यांच्या अस्थीकलशाचे सातारा येथील संगम माहुली येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. चंद्र्रशेखर घोरपडे, रणजित देशमुख, बाबूराव शिंदे, संतोष जाधव, गणेशचंद्र पिसाळ, रविराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘भय्यू महाराज हे विचारांचे व्यासपीठ होते. त्यांच्या विचारांनी आज देशभरात आमच्यासारखे लाखो तरुण कार्यरत आहेत. त्यांचे विचार जोपासणे व वाढविणे हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे.’ बाबूराव शिंदे म्हणाले, ‘एकाच व्यक्तीच्या ठायी असे अनंत सद्गुण असणाऱ्या या राष्ट्रसंताला आज आपण मुकलो आहोत. त्यांची लोकांवर व लोकांची त्यांच्यावर असणारी श्रद्धा ही अफाट आहे. त्यांच्या विचारांचे व आदर्शाचे कायमच जतन व्हावे.’यावेळी गणेशचंद्र पिसाळ, संतोष जाधव, सुशांत निंबाळकर, सुजित आंबेकर, रणधीर जाधव आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
असा सामाजिक संत होणे नाही..भय्यू महाराज यांचे सामाजिक कार्य अफाट आहे. अनेक पिढ्यांना आदर्शवत काम दाखविणाºया या व्यक्तिमत्त्वाचे असे आकस्मिक जाणे हे मनाला न पटणारे आहे. देशासाठी ही एक प्रचंड मोठी सामाजिक हानी ठरली आहे. असा सामाजिक संत यापुढे होणे नाही. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.- श्रीनिवास पाटील, राज्यपाल (सिक्कीम)