सातारा : सातारा पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, त्यांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यांसह विविध मागण्यांसाठी पालिकेतील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ठेकेदारांना याबाबत नोटीसा बजावल्या, मात्र ठेकेदारांची मनमानी सुरू आहे, असा आरोप रिपाइंचे सातारा जिल्हा रोजगार आघाडीचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी यावेळी केला.वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद आहे की, पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार बोनस व पगार दिला जावा, कर्मचाऱ्यांचा आकस्मित मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला सहाय्य म्हणून आर्थिक मदत मिळावी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळावे, हजेरी पुस्तकात त्यांची दैनंदिन नोंद केली जावी, कामादरम्यान सेवकांना सुरक्षेची सर्व साधणे उपलब्ध करावी, आरोग्य विमा काढला जावा, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची प्रशासनाने व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. सहायक कामगार आयुक्तांनी देखील कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे, असे निर्देश दिले. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी बैठका घेऊन संबंधित ठेकेदारांना नोटीसा बजावल्या. तरीदेखील त्याचा काही उपयोग झालेला नाही. ठेकेदारांची मनमानी सुरू असून, अधिकाऱ्यांच्या निर्णयाची संबंधितांनी तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या, सातारा पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण
By सचिन काकडे | Published: November 28, 2023 6:43 PM