दीपक शिंदेअधिकारी महसूलमधील असो, अगर पोलिस प्रशासनातील, इच्छित ठिकाणी बदलीसाठी त्याला नजराणा द्यावाच लागतो. या दोनच विभागातील नाही तर कोणत्याही विभागातील व्यक्तिला अपेक्षित बदली पाहिजे असेल तर हीच पद्धत आहे. पण, हा नजराणा नेमके घेते कोण. त्यासाठीही लोक ठरलेले आहेत. अधिकारी कधीच स्वत: हे धाडस करत नाहीत. त्यामुळे ओळखीचे, कंत्राटी काम करणारे, एजंट, बाहेरून काम करून घेणारे अशी एक टोळीच कार्यरत असते. यांच्यापैकीच कोणाला तरी काम मिळते अन बिनबोभाट पुढील कामही होऊन जाते.ज्याची बदली करायची आहे आणि जो बदली करणार आहे. असे दोन्ही लोक कधीही समोरासमोर येत नाहीत. हे या बदलीच्या प्रकारातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. एकाच जागेसाठी अनेक अर्ज आले तर नजराण्याची किंमत वाढते. ज्याचा नजराना मोठा त्याची जागा फिक्स. कधी कधी हा जुगारच खेळला जातो. कोण किती पैसे देणार हे माहिती नसल्याने कोणाचे काम कधी कमीत होऊन जाते, तर कधी एखाद्याचा खर्च अधिक वाढलेला असतो.या संभाषणाची भाषाही अगदी वेगळी असते. अलीकडे खोक्याचा फारच बोलबाला झाल्याने सध्या कोणी खोक्याकडे जात नाही. काही वर्षांपूर्वी पेटीचाही उल्लेख व्हायचा. सध्या पेटीचा उल्लेख होतो. पण, या व्यवहारात वापरायचे शब्दही अगदी तोलून मापूनच वापरले जातात. सध्या यामध्ये भेट, गिफ्ट, बिस्कीट, चॉकलेट, कॅडबरी अशा शब्दांचा वापर वाढला आहे.
बदलीसाठी पैसे देणाऱ्या व्यक्तीचीही बदली करणाऱ्या अधिकाऱ्याशी क्वचितच भेट होते. पण, त्या अधिकाऱ्याच्या जवळचा माणूस या माणसाच्या जवळचा असतो. कोणी कोणाला कितीचा नजराणा दिला. अलीकडच्याने किती ठेवला आणि पलीकडच्याला किती दिला. ज्याने बदली केली त्याला काय मिळाले की नाही, हादेखील अनेकदा वादाचा प्रसंग असतो. पण, झाकली मूठ सव्वा लाखाची असते. त्यामुळे त्याचा ना बोभाटा होतो, ना तक्रार. कोणाचे होते काम, तर कधी कोणाचे तमाम. एजंट होतात मालामाल आणि बदलीसाठी प्रयत्न करणारा कंगाल. त्यामुळे नव्या जोशाने तो पुन्हा आपल्या कमाईला सुरुवात करतो.
बिस्कीट पुडा आणि कॅडबरीच्या वड्याबदलीच्या या आकड्यांची माहिती घेतल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा क्लुप्त्या काही एजंटांकडून राबविल्या जातात. बिस्कीटच्या पुड्यामध्ये साधारणत: किती बिस्कीट असतात. यावरून आकडा ठरतो. तिच बाब कॅडबरीची आहे. ४० रुपयांची कॅडबरी आहे का शंभर रुपयांची त्या पॅकेटमध्ये किती वड्या आहेत. यावरही आकडा ठरतो. अशा भन्नाट कल्पना लावून हे व्यवहार केले जातात.