सातारा :
सातारा जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायतींसाठी मतदानास रविवारी सकाळी शांततेत प्रारंभ झाला. यासाठी जिल्ह्यात ९२७ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. बहुतांश मतदान केंद्राबाहेर सकाळच्या टप्प्यातच मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या. दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी ३४.५० टक्के मतदान झाले होते.
सातारा जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी ४९ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या होत्या, तर काही अंशत: बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या २५९ ग्रामपंचायतींसाठी गेल्या दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती.
यासाठी रविवारी मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी दुपारी बारापर्यंत सरासरी ३४.५० टक्के मतदान झाले. यामध्ये १ लाख ५२ हजार ९६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७१ हजार ८५७ महिला तर ८१ हजार १०८ पुरुषांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.