तांबवे : विभागात कोयना नदीकाठच्या शिवारात सध्या मोरांचा वावर वाढला आहे. पिकांची काढणी झाल्यामुळे सध्या शिवार रिकामे झाले आहे. काही ठिकाणी शेतकरी मशागतीची कामे करीत आहेत. अशा परिसरात खाद्य मिळविण्यासाठी सध्या मोरांची भटकंती सुरू असून, सकाळच्यासुमारास नदीकाठावर दिसणारे हे मोर आकर्षण ठरत आहेत.
दुभाजक बकाल
ओगलेवाडी : ओगलेवाडी येथे रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे दुभाजक बकाल बनले असून, संबंधित विभागाने गवत काढून दुभाजकात शोभेच्या झाडांची लागवड करण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशांतून केली जात आहे.
स्टंटबाजी धोकादायक
पाटण : परिसरातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यामध्ये दुचाकीस्वार युवकांची संख्या जास्त असते. मात्र, संबंधित युवक दुचाकीचे स्टंट करून धोकादायक रितीने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता असून, अशा स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे गरजेचे आहे.
खांबांवर वेली
तांबवे : विजेच्या खांबासह काही ठिकाणी तारांवरही झाडवेली वाढल्या आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन एखाद्याला जीव गमवावा लागेल, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरील प्रवाहित तारेपर्यंत हे वेल गेले आहेत. त्याचा धक्का बसून एखाद्याचा जीव जाण्याचा धोकाही त्यामुळे निर्माण झाला आहे.