मोरांचा वावर वाढला
सातारा : तालुक्यात ठिकठिकाणी नदीकाठच्या शिवारांत मोरांचा वावर वाढला आहे. सकाळी नदीकाठी मोरांचे आवाज घुमत आहेत. शहरातही महादरे, आंबेदरे, शाहूपुरी या परिसरात असे आवाज येत आहेत. कोरोना काळातील भयावह अस्थिर वातावरणात सकाळच्या वेळेत हा आवाज अनेकांसाठी सुखावह ठरत आहे.
वाहतूक अस्ताव्यस्त
फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. संचारबंदी शिथिल केल्यानंतर सकाळी ७ ते ११ या वेळेत तर याचा त्रास होतो. याकडे वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कणीस विक्रीतून रोजगार
सातारा : सध्या शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी मक्याच्या कणसांची विक्री केली जात आहे. भाजून तसेच उकडून १५ ते २० रुपयांना एक कणीस विकले जात होते. लॉकडाऊनमुळे भाजून कणीस दिले जात नाही. मात्र, कणीस विक्रीतून विक्रेत्यांना चांगला रोजगार मिळत आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव
वडूज : वडूज तालुका व परिसरातील काही भागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. अनेक तरुण सध्या या कामात व्यस्त आहेत.
वाहतूक नियमन आवश्यक
सातारा : लॉकडाऊन काळात सकाळच्या वेळी संचारबंदी शिथिल केल्यानंतर साताऱ्याच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मंडई परिसरासह राजवाडा परिसरातही या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. कोविडचे संक्रमण टाळण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत कमीतकमी गर्दी करावी, असे आवाहन प्रशासन करत आहे.
रस्त्याकडेला कचरा
कऱ्हाड : कडक लॉकडाऊन असला तरीही पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. खाद्यपदार्थांच्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
आरोग्याची काळजी घ्या
मलकापूर : सध्या वातावरणात बदल झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती डॉक्टरांकडून वर्तविली जात आहे. सर्दी, पडसे आदी आजार उद्भवत असून त्यापासून बचाव करून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. कोविड काळात या आजारांकडेही कोविडसदृश्य बघून उपचार करण्याचा प्रयत्न वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत.