सातारा : सतत भाव खाणाऱ्या वाटाण्याचा दर आता गवार आणि पावट्यापेक्षाही कमी झाला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला २५०० रुपयांपर्यंतच दर मिळाला; तर शेवग्याचा दर वाढून नऊ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला आहे. कांद्याचा भाव स्थिर असून लसणाला चांगला दर मिळत आहे.
सातारा बाजार समितीत गुरुवारी ५९ वाहनांतून भाजीपाला आला होता. यामध्ये फळभाज्यांची ८३१ क्विंटल, तर भाजीपाल्याच्या २५०० पेंढ्यांची आवक झाली. त्याचबरोबर ७३ क्विंटल फळे आली होती. मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर गडगडल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी वाटाण्याचा क्विंटलचा दर १० हजारांच्या वर गेला होता. मात्र, सध्या वाटाण्याचा भाव खूपच कमी झाला आहे. गुरुवारी (दि. ७) बाजार समितीत क्विंटलला २२०० हजार २५०० पर्यंत दर मिळाला. इतर काही भाज्यांना तर वाटाण्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे.
बाजार समितीत कांद्याचे दर सध्या स्थिर असल्याचे येत आहे. नवीन कांद्याला क्विंटलला १५०० ते २८०० पर्यंत मिळत आहे; तर लसणालाही चांगलाच भाव मिळत आहे. क्विंटलला तीन हजार ते सात हजारांदरम्यान दर येत आहे. वांग्याला १० किलोंना २०० ते २२० रुपये दर आला. टोमॅटोला ४० ते ५०, कोबी ३० ते ४०, फ्लॉवर १०० ते १५०, दोडक्याला १०० ते २०० रुपये भाव आला. तसेच मिरचीला ३०० ते ४००, ढबू, कारली आणि भेंडीला २०० ते २५०, तर शेवग्याला ८०० ते ९०० रुपये भाव मिळाला. गवारला ४०० ते ४४०, पावट्याला ३०० ते ४००, गाजराला २०० ते २२० रुपये भाव १० किलोंना मिळाला.
चौकट :
मेथी, कोथिंबिरीचे दर वाढू लागले...
सातारा बाजार समितीत अजूनही पालेभाज्यांची आवक अधिक होत होती. त्यामुळे मेथी, पालक, कोथिंबिरीचे दर एकदम कमी झालेले. आता या पालेभाज्यांच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. गुरुवारी मेथीच्या एक हजार पेंढ्यांची आवक झालेली. याला शेकडा दर ५०० ते ७०० रुपयांदरम्यान मिळाला; तर कोथिंबिरीला शेकडा ५०० ते ६०० रुपये भाव आला. पालेभाज्यांचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.