सातारा : मागणी वाढल्याने आणि आवक कमी राहिल्याने साताऱ्यात वाटाण्याचा दर वाढत चालला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला उच्चांकी असा ११ हजार रुपये भाव आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे वांगी, फ्लॉवर भाव खात असून, कांदा दरातही सुधारणा झाली आहे.
सातारा शहर भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ आहे. शहरात सातारा तालुक्याबरोबरच जावळी, वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, आणि कऱ्हाड तालुक्यातूनही भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथील सातारा बाजार समितीत या भाज्यांचा लिलाव होतो. त्यानंतर बाजार समितीतून माल मंडईतील विक्रेते व दुकानदार घेऊन जातात. सातारा बाजार समितीत कांदा, बटाटा आणि इतर पालेभाज्यांची आवक अधिक राहते.
सातारा बाजार समितीत गेल्या पाच दिवसांपासून वाटाणा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सध्या क्विंटलला १० ते ११ हजारांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मागील महिन्यापूर्वी क्विंटलचा दर १० हजारपर्यंत होता. त्यानंतर हाच दर ३ हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, काही दिवसांतच दर वाढल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
सातारा बाजार समितीत वांगीही भाव खाऊ लागली आहेत. मंगळवारी १० किलोला ३०० ते ३८० रुपये दर मिळाला. मात्र, आठ दिवसांपूर्वी १०० ते १५० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. सध्या वांग्याचा दर वाढल्याने किरकोळ विक्री ४० रुपये किलोच्या पुढे गेली आहे. फ्लॉवरलाही चांगला दर मिळत आहे. १० किलोला ५०० रुपयांपर्यंत दर गेला आहे. तसेच टोमॅटो दरात थोडी सुधारणा झाली. टोमॅटोला १० किलोला १०० ते १५०, तर दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. भेंडीला २०० ते २५०, शेवगा ४०० ते ५००, पावटा ३०० ते ४००, गवार ५०० ते ५५०, वालघेवड्याला ३०० ते ३५०, काळा घेवडा ५०० ते ६०० आणि गाजराला १० किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. या भाज्यांच्या दरातही सुधारणा झाली आहे.
कांद्याच्या दरातही किंचीत सुधारणा झाली. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याला क्विंटलला दोन हजारांपर्यंत दर मिळत होता. त्यानंतर भाव उतरला. परिणामी १६०० रुपयांपर्यंत दर आला होता. मात्र, पाच दिवसांपासून दरात सुधारणा झाली. मंगळवारी क्विंटलला २०० पासून १८०० पर्यंतर दर आला.
चौकट :
बटाटा, लसणाला उठाव कमी...
साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. मात्र, बटाटा, लसूण, आले यांना उठाव कमीच असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून अशी स्थिती आहे. बटाट्याला क्विंटलला १३०० ते १४०० रुपये भाव मिळाला. लसणाला २ ते ६ हजार, आल्याला क्विंटलला १५०० ते २ हजार रुपये दर आला. मिरचीचाही दर कमी आहे. क्विंटलला १ ते २ हजारांपर्यंत भाव मिळाला. मेथीचा दर वाढला आहे.
.....................................................................