मायणी : स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके विकासापासून वंचित असलेल्या खटाव तालुक्यातील पूर्व भागातील विविध समस्यांकडे प्रशासन व राज्यकर्ते यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माणिक महाराजा पाचवडकर यांनी मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मौजे कानकात्रे येथून तरसवाडी, ता. खटावपर्यंत पदयात्रा काढली.
देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्षांचा काळ लोटला तरी जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाºयांकडून विखळे, पाचवड, मुळीकवाडी, कलेढोण, ढोकळवाडी, औतरवाडी, गारुडी, गारळेवाडी, तरसवाडी व मायणी पूर्व भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला नाही. वर्षातील सहा ते आठ महिने या भागांतील ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागते. तसेच हंडाभर पाण्यासाठी दोन-चार किलोमीटर पायपीट करावी लागते.
निवडणुकीच्या काळात प्रत्येक राज्यकर्त्यांकडून फक्त पाणी प्रश्नाचे गाजर दाखविले जात आहे. पाण्याव्यतिरिक्त इतर प्रश्नांकडे कानाडोळा केला जात आहे. आज या भागात एक किलोमीटरही अंतरात खड्डा नाही असा रस्ता नाही.
औद्योगिक क्षेत्र नाही. पावसाच्या जीवावर शेती केली जाते. उद्योगासाठी व कुटुंब चालविण्यासाठी तसेच रोजगारासाठी शेकडो किलोमीटर दूरवर जाऊन नोकरीच्या शोधात येथील तरुण भटकत आहे. मात्र, शासन व राज्यकर्ते या गोष्टींकडे कायम कानाडोळा करीत आले आहेत.
या भागातील विविध समस्यांकडे शासन व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी माणिक महाराज पाचवडकर यांनी मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मौजे कानकात्रे येथून तरसवाडी, ता. खटावपर्यंत पदयात्रा काढली. या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरामध्ये कोणत्याही शासकीय किंवा कार्यकर्त्यांनी त्यांना भेट दिली नाही.
विखळे तालुका येथील काही कार्यकर्त्यांनी विखळे चौकांमध्ये त्यांचे स्वागत केले तर मायणी पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी भेट देऊन सुरक्षिततेचे नियोजन केले.