लोणंद : औद्योगिक वसाहतीमधील सोना अलाईज व प्रिव्हिलेज इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांकडून होत असलेल्या जल व प्रदूषणाबाबत माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते सत्त्वशील शेळके यांना खोटी माहिती दिल्याबद्दल तत्कालीन जन माहिती अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अनिल कदम यांना राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी दंडाची शिक्षा केली असून, हा दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले आहे.लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलाईज व प्रिव्हिलेज इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जल व वायू प्रदूषण होत असून, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सत्त्वशील शेळके यांनी या दोन्ही कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाबाबत शेकडो नागरिकांच्या सह्याचे निवेदन सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, या दोन्ही कंपन्यांवर कसलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी अनिल कदम यांच्याकडे सोना अलाईज व प्रिव्हिलेज इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या प्रदूषणाबाबत काय कारवाई केली, अशी माहिती विचारली असता कोणतीही कारवाई न करता खोटी माहितीचे पत्रे देऊन त्यांनी शासनाची माहिती मागणाऱ्याची फसवणूक केली म्हणून सत्त्वशील शेळके यांनी जनमाहिती अधिकारी अनिल कदम यांच्याविरुद्ध अपील केले होते. त्यावर देखील कोणतीच कारवाई न झाल्यामुळे त्यांनी पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्ताकडे अपील केले होते.त्यावर सुनावणी होऊन जनमाहिती अधिकारी अनिल कदम यांनी मुदतीत माहिती न दिल्याबद्दल त्यांना राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी तीन हजार रुपयांचा दंड केला असून, तो दंड पगारामधूनवसूल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सत्त्वशील शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारेदिली. (वार्ताहर)प्रशासन कारवाई करणार? सोना अलाईज व प्रिव्हिलेज इंडस्ट्रीज यांच्या जल व वायू प्रदूषणामुळे सर्व लोणंदकर हैराण झाले असून, प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेतून याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. आता तरी यामधून धडा घेऊन प्रशासन या कंपन्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला दंड
By admin | Published: March 29, 2015 11:08 PM