प्रमोद सुकरे
कराड : फक्त चाळीस रुपये भरा आणि तीन महिने मोफत धान्य मिळवा. शासनाची ‘कोविड स्कीम’ आली आहे. त्यातून टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावर सोळा हजार रुपये जमा होतील. तुम्ही फक्त चाळीस रुपयांसोबत रेशनकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स जमा करा, असे सांगून पैसे गोळा करण्याचा फंडा कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे यात अंगणवाडीसेविकांनी पुढाकार घेतल्याने लोकांचा त्यावर विश्वास बसत चालला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील अनेक गावात सध्या अंगणवाडीसेविका घरोघरी जाऊन या तथाकथित योजनेची माहिती देत आहेत. ही माहिती फायदेशीर वाटत असल्याने गावच्या अंगणवाडीत पैसे भरण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. अंगणवाडीत बसूनच चाळीस रुपयांप्रमाणे पैसे गोळा केले जात आहेत. बाहेरून आलेले दोन-चार लोक हे योजनेचे अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. तोंडी माहिती दिली जाते आहे. चाळीस रुपयात एवढा लाभ मिळणार आहे म्हटल्यावर ग्रामीण भागातील लोकांची पैसे भरण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत आहे.
नांदगाव (ता. कराड) येथेही संबंधित योजनेची माहिती देण्यासाठी स्वयंघोषित अधिकारी अंगणवाडीमध्ये दाखल झाले होते. अंगणवाडीत पैसे जमा करण्याचे काम सुरू होते. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे व अनिकेत माळी यांना समजली त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन योजनेसंबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदर योजना राज्य सरकारची असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. नंतर ती योजना लगेच केंद्र सरकारची असल्याचे सांगितले. त्यासंबंधीचे काही माहितीपत्रक आहे का, असा प्रश्न विचारल्यावर थातूरमातूर उत्तरे द्यायला सुरुवात झाली. तुम्हाला पटत असेल तर पैसे भरा अन्यथा विषय सोडून द्या, असे संबंधितांनी सांगायला सुरुवात केली. तरीही पन्नासवर लोकांनी यात पैसे भरले आहेत.
अंगणवाडीसेविका या नेहमीच शासनाच्या विविध योजना राबवण्यात पुढे असतात. या स्कीममध्येही अंगणवाडीसेविकांनी पुढाकार घेतल्याने लोकांना ही योजना शासनाची आहे, असे प्रथमदर्शनी वाटत आहे. फक्त चाळीस रुपये तर भरायचे आहेत; झाला फायदा तर झाला, असे समजून पैसे भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण असे ४० रुपयांनी पैसे जमा करून किती मोठा घोटाळा होऊ शकतो याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.
प्रत्येक गावांमधील शंभर ते दोनशे लोक पैसे भरत असल्याचे समजते. जर एका गावात शंभर लोकांनी चाळीस रुपयांप्रमाणे पैसे भरले तर ते चार हजार रुपये होतात. तालुक्यातील शंभर गावात अशाप्रकारे पैसे भरले गेले तर ती रक्कम चार लाख होते. असे पैसे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात पैसे भरले गेले तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होऊ शकतो, याचा शांतपणे पैसे भरणाऱ्यांनी विचार करायला हवा.
दरम्यान, कराड तालुक्यातील नांदगाव; कालवडे परिसरातील अनेक गावात हे पैसे जमा करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे या घोटाळेबाज लोकांना आळा बसायला मदत होईल.
चौकट
ना पावती, ना माहितीपत्रक ...
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून पैसे जमा करून घेतल्यावर एका साध्या कागदावर त्याची नोंद केली जात आहे. पैसे भरणाऱ्या व्यक्तीला याबाबतची कसलीही पोहोचपावती दिली जात नाही. त्यामुळे पैसे भरले याचा कोणताही पुरावा संबंधितांकडे राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. तसेच या योजनेचे कोणतेही छापील माहितीपत्रक दिले जात नाही हे विशेष!
चौकट
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. जमावबंदीचा आदेश आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडीसेविकांकडून गावोगावी लोकांना एकत्रित करणे किती योग्य आहे? पैसे भरण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे. तेथे अनेकांच्या तोंडाला मास्क दिसत नाही. सॅनिटायझरचा तर पत्ताच नाही. याकडे कोण लक्ष देणार? दोषींवर कोण कारवाई करणार, हे पहावे लागणार आहे?
चौकट
साताऱ्यात आमचं ऑफिस आहे ..
या योजनेचे सातारा येथे ऑफिस आहे. तेथे पैसे भरल्यानंतर अधिकृत फॉर्म भरले जाणार आहेत. असे योजना राबवणाऱ्या अंगणवाडीसेविका सांगतात. पण ऑफिसचा पत्ता व तेथील फोन नंबर मागितल्यावर तो देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
कोट
कोविड स्कीम नावाची कोणतीही योजना आमच्या विभागाकडून राबविली जात नाही. अशा कोणत्याही योजनेसाठी ४० रुपये प्रमाणे पैसे जमा करण्याच्या सूचना आम्ही अंगणवाडीसेविकांना केलेल्या नाहीत. असे कोणत्या गावात घडत असेल तर लोकांनी ही बाब आमच्यापर्यंत कळवावी.
सुप्रिया पवार
बालविकास प्रकल्प अधिकारी, कराड