सातारा : गावात कोणतंही काम करायचं म्हटलं तर मोजकीच मंडळी येत; पण ‘संसद निर्मल ग्राम’ योजनेअंतर्गत कोंडवे गावाची निवड झाली. अन् ग्रामस्थांच्या मनाचंही परिवर्तन झालं. रविवार, दि. १६ रोजी आयोजित स्वच्छता मोहिमेत तिपटीनं गावकरी सहभागी झाली होती.प्रत्येक गावात राजकीय गट-तट असतात तसेच कोंडवेमध्येही होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘संसद ग्राम’ योजनेअंतर्गत कोंडवे गावाची निवड केली. त्यावेळी ‘लोकमत’ने कोंडवे गावातील एकीविषयी आठवण करून देणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे तरुणांमध्ये उत्साह संचारला. त्यातच विविध अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्याने गावकऱ्यांमध्ये सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.कोंडवेत तीन आठवड्यांपासून दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. रविवार, दि. १६ रोजी पारापासून ते भाऊकाय मंदिर अन् तेथून ज्योतिबा मंदिरापर्यंतची साफसफाई करण्यात आली आहे. यामध्ये १५ वर्षांच्या बालकापासून ते ५० वर्षांच्या आजोबांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. गावात आता दररोज सायंकाळी ग्रामस्थांची बैठक होत असून, त्यातून गावाच्या विकासाबाबत चर्चा केली जात आहे. मोहिमेस प्रारंभ झाला, त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोईनकर, डॉ. अविनाश पोळ यांनी गावची पाहणी केली होती. त्यानंतर आजवर प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार राजेश चव्हाण यांनी भेटी देऊन विकास आराखड्याबाबत चर्चा केली आहे. गावाला आठवड्याचे सात दिवस चोवीस तास पाणीपुरवठा कसा होईल, यादृष्टीने योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)मुक्काम पोस्ट कोंडवे
स्वच्छतेसाठी गावकरी एकवटले!
By admin | Published: November 17, 2014 10:50 PM