सातारा : ‘शासनाने कोरोनाविषयी नवीन निर्बंध लागू केले आहेत. ते लोकांनी कडकपणे पाळावेत. तसेच ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी सुरू असणाऱ्या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी पूर्णत: सहकार्य करावे, अजिबात विचलित होऊ नये,’ असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी म्हटले आहे की, ‘मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात लसीकरणही सुरू झाले आहे. नोंदणीकरण करणे आणि प्रत्यक्ष लसीकरण या बाबतीत संपूर्ण काटेकोर नियोजन झाले आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे. जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्वच पातळ्यांवर अधिकारी आणि नोडल ऑफिसर नियोजनाप्रमाणे काम करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध कडकपणे पाळावेत असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा पुढे म्हणाले, ‘सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे ही यशाची त्रिसूत्री नागरिकांनी काटेकोरपणे पाळावी. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातही सोय करण्यात आलेली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. यासाठी योग्य वेळेत नोंदणी करावी. कुठेही विनाकारण गर्दी करू नये. प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत. कारण, सर्वांनीच आपापल्या जबाबदाऱ्या ओळखणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. नागरिकांनी स्वत: दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांची साथ मिळाली तर आपण लवकरात लवकर कोरोना संकटावर यश मिळवू, असा विश्वासही मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी व्यक्त केला आहे.