सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात २१ आणि २२ जुलैला धो-धो पाऊस पडला. कास, नवजा, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने नवा विक्रम नोंदवला. हा पाऊस सर्वांसाठीच कर्दनकाळ ठरला. रस्ते वाहून गेले, दरडी पडल्या अन् गावांचा संपर्क तुटला. तर ओढे, नदीत पाणी न मावल्यामुळे शेतात वाट शोधत ते गेले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतीचे बांध, जमिनी तोडून टाकल्या. डोंगरावर भूस्खलन होऊन माती आणि दरड लोकांच्या घरावर आली. यामुळे अनेक गावांमधील ४०हून अधिक जणांचा बळी गेला. मुकी जनावरेही या मातीत गडप झाली. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांवर आणि नुकसान झालेल्या लोकांवर आभाळच कोसळलं. पाऊस कोसळत होता अन् काही माणसं मातीत अडकली होती. त्यांना वाचवायचे कसे, हा प्रश्न होता. पण, शासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधीही वेळेवर अन् कोणत्याही संरक्षणाची वाट न पाहता आपत्तीग्रस्तांना बळ देण्यासाठी धावले.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भूस्खलन झाल्याने काहीजणांचा मृत्यू झाला. त्यावेळी याची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील शासकीय यंत्रणेबरोबर घटनास्थळी पोहोचले. पाऊस सुरु असतानाच लोकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मदत पोहोचविण्याचे काम केले. आमदार पाटील यांच्यामुळे शासकीय यंत्रणा आणखी अलर्ट झाली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे हेही लोकांच्या मदतीला धावले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही वेळ काढून वाई तालुक्यात पोहोचले. पाण्यातून वाट काढत त्यांनी माहिती घेतली. तर मेढा - महाबळेश्वर मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झालेली. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली.
अतिवृष्टीत पाटण तालुका सर्वाधिक बाधित झाला. भूस्खलनात अनेकांचा जीव गेला. या घटना घडल्या त्या दुर्गम भागात. ज्या ठिकाणी जायला ठीक रस्ताही नव्हता. रस्ते वाहून गेलेले, झाडे पडली होती. त्यामुळे चार-पाच किलोमीटर चालत जावं लागलं. त्यातच वरुन पडणारा पाऊस, चिखलात रुतणारे पाय. तरीही धोक्याची पर्वा न करता पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शासकीय यंत्रणेच्या बरोबरीने पोहोचले. लोकांशी संवाद साधला, धीर दिला तसेच शासकीय यंत्रणेला भूस्खलनातील लोकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी फर्मान सोडलं. त्यामुळे लोकांची सोय तात्पुरत्या निवाऱ्यात का असेना झाली. तसेच भूस्खलनात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेबरोबर थांबले. सत्यजित पाटणकर यांनीही लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही पाटणमधील भूस्खलनग्रस्तांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर स्थलांतर केलेल्या ठिकाणी जेवण केले. त्यांच्या अडचणी जाणून घेत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा शब्द दिला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाटणमधील भूस्खलन झालेल्या हुंबरळी, ढोकावळे आदी गावांना भेट दिली. लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना लढण्याचं बळ दिलं.
अशाप्रकारे राज्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी आपत्ती कोसळलेल्या लोकांना भेटून त्यांच्यात खऱ्याअर्थाने आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम केलं, हे निश्चितच उभारी देणारं ठरलं आहे.
............
संकटावर स्वत:लाच स्वार व्हावं लागतं; लढ म्हणणं महत्त्वाचं असतं...
कोणत्याही संकटाविरोधात स्वत:लाच उभं राहावं लागतं. आश्वासनं मिळतात, मदत मिळते पण पुढील आव्हान पेलण्यासाठी स्वत:चेच खांदे मजबूत करावे लागतात. अशाचप्रकारे आताच्या आपत्तीतील लोकांना वेदना बाजूला ठेवून पुढचा विचार करुन लढावंच लागणार आहे. शासन, प्रशासनाची मदत होईल. पण, सर्व भार त्यांनाच पेलावा लागणार आहे. तरीही लोकप्रतिनिधींनी पाऊस, पाणी व तुटलेल्या रस्त्यांचाही विचार न करता चिखलातून मार्ग काढत आपत्तीग्रस्तांना जगण्याचं दिलेलं बळ आणि निर्माण केलेला आत्मविश्वास दुर्लक्षून चालणारा नाही.
- नितीन काळेल
फोटो दि. ३१ सातारा नितीन संडे स्पेशल फोटो... (मेलवर)
..............................................................................