सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचा टक्का पुन्हा वाढू लागला आहे. बुधवारी २ हजार १५६ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ४० बाधितांचा मृत्यू झाला. कोरोना वाढीचा दर १८.६० टक्के झाला.
सातारा तालुक्यात सर्वांत जास्त ४३७ इतके, तर त्याखालोखाल फलटण तालुक्यात ४०८ रुग्ण बाधित आढळले. खटाव तालुक्यातदेखील रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नाही. वाई तालुक्यातील रुग्णसंख्येची वाढ घटलेली आहे. त्याउलट जावळी, पाटण या दुर्गम तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजार ४९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ३ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या बुधवारच्या संध्याकाळपर्यंत ९४३ नागरिकांना घरी सोडण्यात आले. २० हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करूनदेखील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही बाब चिंतेची ठरलेली आहे. एका बाजूला उद्योग-व्यवसाय बंद ठेवल्याने लोकांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला रुग्णसंख्याही रोखता येत नसल्याने प्रशासनाचे अपयश समोर येऊ लागले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
चौकट
आरटीपीसीआर चाचणीतून आढळले सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात बुधवारी २ हजार ९९८ लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामधून ९०३ रुग्ण बाधित आढळले आहेत. या चाचणीतील रुग्णवाढीचा दर अजूनही कमी येत नसल्याचे दिसून येत आहे. या चाचणीतील रुग्णवाढीचा दर ३०.१२ टक्के एवढा वाढलेला आहे.
चौकट
अजित पवार, राजेश टोपे शुक्रवारी साताऱ्यात
सातारा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करूनदेखील रुग्णांची संख्या कमी होत नाही. याच काळात मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणावर झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे शुक्रवार, दि. २८ मे रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीतच साताऱ्यातील मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.