सातारा : माण तालुक्यातील आंधळी धरण येथे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना माणगंगेबरोबरच खटावमधील येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करण्याची विनंती केली आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार करुन साकडेही घालण्यात आले आहे.याबाबत संघटनेकडून देण्यात आलेली माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १९ फेब्रुवारी रोजी आंधळी धरण येथे दिवंगत गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपुजनाला येणार आहेत. माण तालुक्याच्या दृष्टीने हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहला जाणार आहे. खरेतर या योजनेची सुरुवात २८ वर्षापूर्वी झाली असलीतरी अनेक हेलकावे खात जिहे कटापूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला जात आहे. या योजनेचे पाणी जिहे कटापूरमधून नेर धरणात जाते. त्यानंतर या नेरमधूनच १४ किलोमिटर बोगद्याद्वारे आंधळी धरणात दाखल झाले आहे. आता आंधळी धरणातून माणगंगा नदी प्रवाहित केली जाणार आहे. याच पाण्याचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.माणमधील जलपूजन सोहळा आंधळी धरणात पूर्णत्वास जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करून माण तालुक्याबरोबरच खटावलाही येण्याचे साकडे घातले आहे. कारण, या पाणी योजनेला पंतप्रधान मोदी यांचे गुरू दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्यात आले आहे. इनामदार यांचे मूळ गाव खटाव आहे. त्यांच्याच तालुका आणि गावातून वाहणाऱ्या येरळामाई नदीचाही जिहे कटापूर योजनेत समावेश आहे. या योजनेतूनच येरळामाई नदीवरील १५ बंधारे भरण्याची तरतूद आहे. तसेच योजनेतून खटाव तालुक्यातील जवळपास ११ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.सध्या माणबरोबरच खटाव तालुक्यातही दुष्काळ पडला आहे. उरमोडीचे आवर्तनही एक महिना उशिरा सुटले आहे. त्यामुळे पिके वाया गेली आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर खटावच्या जनतेला भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पशुधन अडचणीत येणार आहे. यासाठी येरळामाई प्रवाहित करून खटाववासियांचा आनंद द्विगुणित करण्याची गरज आहे.दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला निमंत्रण पाठवले आहे. हे निमंत्रण कार्यालयाला प्राप्त झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पंतप्रधान कार्यालय उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.
जिहे कटापूर योजनेद्वारे कृष्णामाई माणगंगा आणि येरळामाई नदी प्रवाहित होऊन दुष्काळमुक्ती करेल असे स्वप्न १९९५ पासून खटाव आणि माणमधील जनता उराशी बाळगून आहे. माणगंगा नदीचे निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण प्रवाहित करून जलपूजन केले जात आहे. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तो क्षण माणगंगेबरोबरच खटावची वरदायिनी असलेल्या येरळामाईच्या वाट्याला यायला पाहिजे होता. मात्र, असे घडत नसल्याने खटाववासियांना प्रचंड वाईट वाटत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करुन माणगंगेबरोबरच खटावमधील येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. - अनिल पवार, राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना