सागर गुजरसातारा : दरवर्षी श्रावणी सोमवारी खटाव तालुक्यातील नागनाथवाडी (ललगुण) येथील नागनाथ मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सर्पदर्शन प्रथेला यंदापासून पूर्णविराम देण्याचा निर्णय नागनाथवाडी, ललगुण ग्रामस्थांनी घेतला.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पोलीस प्रशासन, यात्रा कमिटी व ग्रामस्थांची एकत्रित बैठक नागनाथवाडी येथे पुसेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विश्वजित घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
अनेक वर्षे नागनाथ मंदिरात श्रावणी सोमवारी भाविक, भक्तांची गर्दी होत असते. याबाबतच्या अनेक तक्रारी कोरेगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आल्या होत्या. कोरेगावचे सर्पमित्र योगेश धुमाळ व अंनिसचे कोरेगाव कार्यकारिणी संघटक हेमंत जाधव यांनी चार वर्षांपासून यासाठी प्रशासन पातळीवर आवाज उठवून ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.
गतवर्षी कोरेगाव उपविभागाच्या पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी सबंधितांना प्रथा बंद करण्याची सूचना केली होती. तथापि ही प्रथा छुप्या मार्गाने सुरू ठेवून सर्पांची हेळसांड सुरूच होती. यंदा श्रावण उत्सव सुरू होण्यापूर्वीच ‘अंनिस’ने पुसेगाव पोलीस ठाण्याला निवेदन देऊन ही प्रथा तातडीने बंद करण्याची मागणी केली. त्यावर पोलीस उपनिरीक्षक विश्वजित घोडके यांनी दोन्ही गावचे ग्रामस्थ, पदाधिकारी, देवस्थानचे ट्रस्टी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांची एकत्र बैठक बोलावून सामोपचाराने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला.
दीडशे वर्षांच्या प्रथेपुढे कायद्याचा मानयात्रा जरूर साजरी करावी. मात्र वन्यजीवांचा त्यासाठी बळी देऊ नये, पर्याय म्हणून नाग प्रतिमेचे पूजन करावे, अशी विनंती ग्रामस्थांना केली. त्यावर ग्रामस्थांमधूनही अनेक मत-मतांतरे आली. शे-दीडशे वर्षांची प्रथा कशी बंद करायची, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. कायद्याच्या चौकटीत ही प्रथा बसत नसून प्रसंगी सर्प प्रदर्शन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा पवित्रा डॉ. हमीद दाभोलकर व पोलीस अधिकारी घोडके यांनी घेतल्यानंतर पहिल्या दोन सोमवारच्या उत्सवानंतर प्रथा बंद करण्याचा निर्णय केला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाठपुरावा, कोणत्याही वाद, विवादाशिवाय पुसेगाव पोलीस प्रशासनाने घेतलेल्या तडक निर्णयाने अनेक वर्षे सुरू असलेली ही सर्प पिलांच्या प्रदर्शनाची प्रथा अखेर बंद करण्याच्या निर्णय कौतुकास्पद आहे.- हमीद दाभोलकर, राज्य सहकार्यवाहक, मानस मित्र प्रकल्पभाविकांच्या श्रद्धेचा फायदा उठवत याठिकाणी सर्प दर्शन घडवून आणण्याचा प्रकार सुरू होता. सर्पाची लहान-लहान पिले मुख्य गाभाऱ्यात सोडली जायची. त्या माध्यमातून भ्रामक अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात होते. यातून भाविकांची लूटही केली जात होती.- प्रशांत पोतदार, प्रधान सचिव