कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या राज्याला रक्ताची गरज असून, रक्त नसल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया थांबून आहेत. मात्र, लोकमत कायम अडचणीच्या काळात मदत करत असते. हीच भूमिका रक्तदान मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे लोकमतचा कायम आधार वाटतो, असे मत नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केले.
शाहुपुरी येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत लोकमत आयोजित रक्ताचं नातं या रक्तदान मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, शाळेचे मुख्याध्यापक संतोष सापते, शाहुपुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, लोकमतचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, मुख्य उपसंपादक दीपक शिंदे, जाहिरात व्यवस्थापक संतोष जाधव, वितरण विभागप्रमुख अमोल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्षा कदम म्हणाल्या, रक्ताचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा कमी असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. पण, लोकमतने जिल्ह्यात राबविलेल्या रक्ताचं नातं या मोहिमेमुळे सर्वांना आधार मिळणार असून, मोठ्या प्रमाणावर रक्त जमा होणार आहे. त्याचा उपयोग अनेक लोकांना होऊन त्यांना जीवदान मिळेल. त्यामुळे सर्वांनीच या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे.
सहायक पोलीस निरीक्षक सापते म्हणाले, रक्तदानासारखे महान कार्य आपल्या हातून होत आहे हे महत्त्वाचे आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून रक्तदान करावे, ते इतरांसाठी नक्कीच जीवदान ठरेल.
कार्यक्रमाला लोकमतचे संपादकीय, जाहिरात, वितरण विभागाचे सहकारी, छत्रपती मराठा साम्राज्य संघटना महाराष्ट्राचे ओंकार देशमुख आणि सहकारी, रक्तदाते निवृत्ती पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
रक्तदान नव्हे जीवदान
वयाची ६५ वर्षे पूर्ण करणारे आणि आत्तापर्यंत ५४ वेळा रक्तदान केलेले निवृत्ती पाटील यांनी हे रक्तदान नव्हे जीवदान आहे, असे मत व्यक्त केले. जेव्हा एखाद्याचा अपघात होतो आणि रक्त उपलब्ध नसल्यामुळे त्याला प्राणांना मुकावे लागते, त्यावेळी रक्ताची किंमत काय आहे याची जाणीव होते. रक्तदानामुळे किमान चार जणांना जीवदान मिळत असते. त्यामुळे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. आत्तापर्यंत ५४ वेळा रक्तदान केले असून, आता वय वाढल्याने अजून एकदा रक्तदान करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
चौकट
लग्नाचा वाढदिवस रक्तदान करुन साजरा
लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. काहींनी आपल्या वाढदिवसानिमित्त तर काहींनी लग्नाचा वाढदिवसही रक्तदान करून साजरा केला. सहायक प्राध्यापक सूर्यकांत अदाटे आणि कुमुदिनी अदाटे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले, तर सखी मंचच्या सदस्यांनीही रक्तदान केले.