सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शिक्षणाच्या स्वरुपाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने आदेश निगर्मित करण्यात आले. यांतर्गत शाळेत ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.राज्यात मिशन बिगन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. जे शिक्षक इतर गाव, शहरापासून प्रवास करून येतात, त्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता वैयक्तिक वाहन वापरून शाळेत यावे.
लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश द्यावा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यापूर्वी शाळेचे किमान २ ते ३ वेळा निर्जंतुकीकरण करावे, शालेय प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीऐवजी स्पर्शविरहित हजेरीची पर्यायी व्यवस्था करावी, शाळेत येताना व असेपर्यंत शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य असेल.
शाळा व्यवस्थापनांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षिक करणे, शिपाई व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक सुरक्षेसाठी वापरलेल्या वस्तूंची व्हिल्हेवाट लावणे, थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी किंवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे, तत्काळ रुग्णालय किंवा जिल्हा व राज्य संपर्क क्रमांकास कळवावे व परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, असेही सुचित करण्यात आले आहे.