सातारा : ‘प्रबोधनामध्ये मोठी ताकद आहे; तथापि एकाच वर्षी पूर्ण परिवर्तन होण्याची अपेक्षा नसल्याने पालिकेच्या मालकीचे मोती तळे आणि आमच्या मालकीच्या मंगळवार तळ््यात विसर्जनास परवानगी देणे संयुक्तिक होईल. तथापि, श्रींचा उत्सव आणि नवरात्रोत्सवानंतर पालिकेने तातडीने तळी स्वच्छ करण्याची योजना युध्दपातळीवर राबवावी,’ अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उदयनराजेंनी म्हटले आहे, ‘श्रींच्या मूर्तींचे विघटन न झाल्याने प्रदूषण होऊ लागले आहे. पर्यावरणावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शासकीय, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर प्रबोधन करण्यात येत असले तरी कोणतीही पध्दत एकदम नष्ट होणार नाही. सर्व बाबींचा विचार करुन, यंदा शासनाला मोती तळे व मंगळवार तळ्यात विसर्जनास परवानगी द्यावी लागेल.’ मंगळवार तळ्यातील प्रदूषणामुळे स्थानिकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने तेथील नगरसेविका हेमांगी जोशी यांचा तळ्यात विसर्जनास विरोध असून, सश्रध्द भाविक नागरिकांचीही तीच भूमिका आहे, असे स्पष्ट करून पत्रकात म्हटले आहे, ‘दीड महिन्यापूर्वीच मी मंगळवार तळ्याची पाहणी केली. गतवर्षीच्या मूर्ती जशाच्या तशा विखुरलेल्या आम्ही पाहिल्या. त्याच वेळी यंदा विसर्जन मंगळवार तळ्यात नको, अशी भूमिका मी मांडली होती. परंतु नगरपालिका किंंवा जिल्हा प्रशासनाकडून अजूनही सक्षम पर्यायी व्यवस्था समोर आलेली नाही. काही मंडळांकडे मूर्ती कायमस्वरुपी ठेवण्यास जागा नाही. पालिकेने गोडोलीत कृत्रिम तळे तयार केले आहे; परंतु अशी तळी तयार करण्यासाठी पालिकेला मोठा आर्थिक भार उचलावा लागत आहे. त्यामुळेच प्रबोधनाच्या माध्यमामधून लहान आणि शाडूच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना जोपर्यंत शंभर टक्के होत नाही तोपर्यंत तळ्यामध्ये विसर्जनबंदी योग्य ठरणार नाही.’ (प्रतिनिधी)सामाजिक संस्थांनी पुढे यावेआपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून विसर्जनानंतर तळ्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य द्यावे अशी सूचना केली असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे. तळ्यांची स्वच्छता करण्यास मंगळवार तळे विकास प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संस्था पुढे येत असतील तर अशांच्या सहयोगातून पालिकेने तातडीने तळी स्वच्छ करावीत, तरच प्रदूषणामुळे होणारा उपद्रव टळेल,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
लगेच स्वच्छता करण्याच्या अटीवर तळ्यांत विसर्जनाला परवानगी
By admin | Published: August 31, 2014 10:09 PM