सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेशात आणखी काही अत्यावश्यक बाबींचा समावेश केलेला आहे. यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी मॉल्स तर सेतू कार्यालयेही सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच मेडिकल्स सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, रुग्णालयातील मेडिकल्स २४ तास उघडी ठेवण्यास परवानगी आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कलम १४४ लागू केले होते. तसेच सुरू काय राहणार आणि बंद काय ठेवावे लागणार हे स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी नवीन आदेशाने आणखी काही बाबींना अत्यावश्यक सेवेत स्थान दिले आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेमध्ये पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊ सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी, माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळ विक्रेते, व्हेटर्रनरी हॉस्पिटल, अॅनिमल केअर सेंटर व पेट शॉप्स, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींसाठी आवश्यक कच्चामाल गोदामांचा समावेश केला आहे. ही आस्थापना व कार्यालये आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार आहे.त्याचबरोबर एखादी व्यक्ती सोमवार ते गुरुवार या दिवशी रात्री ८ ते सायंकाळी ७ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत ट्रेन, बस, विमान यामधून येणार किंवा जाणार असेल तर त्यांना वैध तिकीटाच्या आधारावर स्थानक किंवा घरापर्यंत प्रवास करता येणार आहे. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
- औद्योगिक कामगारांना ओळखपत्राच्या आधारे वाहनाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येणार.
- परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री ८ नंतर किंवा शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत प्रवास करायचा असल्यास हॉल तिकीट आवश्यक.
- परीक्षांसाठी निुयक्त कर्मचाऱ्यांना आदेशाच्या आधारावर प्रवास करण्यास परवानगी.
- आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी, रविवारी विवाह समारंभास परवानगी देण्याबाबत संबंधित तालुक्याचे तहसीलदार निर्णय घेणार.
- सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत फक्त अत्यावश्यक वस्तुंची विक्री करण्यासाठी मॉल्स सुरू.
- सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कलावधीत शेतीमाल अवजारे, वाहन व माल वाहतूक दुरुस्ती उद्योग (उदा. शेती अवजारे, वाहन दुरुस्ती, स्पेअर पार्ट, पंक्चर काढण्याची दुकाने ) सुरू ठेवण्यास परवानगी.
- सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत मेडिकल दुकाने सुरू. मात्र, हॉस्पिटलमध्ये असणारी २४ तास सेवा देणार.
- जिल्ह्यातील सर्व सेतू कार्यालये सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत सुरू.
- बांधकामाचे साहित्य सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत व्यावसायिकांना त्यांच्या जागेवर पोहोच करता येईल.