भुर्इंज : वाई तालुक्यातील पाचवड येथे विनापरवाना ‘बिअरबार’वरुन ग्रामसभेत रणकंदन झाले. ‘या बारसाठी अर्थपूर्ण तडजोडी झाल्याचा’ आरोप काही ग्रामस्थांनी केला. मात्र, ‘या बारसाठी ग्रामपंचायतीने कोणतीही परवागी दिली नाही,’ असा दावा सरपंच, ग्रामसेवकांनी केला. बिअरबारबरोबर अनेक कारणांवरुन ही ग्रामसभा गाजली असून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडले आहेत.पाचवड व उडतरे गावच्या दरम्यान बिअरबार सुरू झाला आहे. या ठिकाणी २०१३ मध्ये हॉटेल सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी ग्रामपंचायतीने दिली. तसेच हे बांधकाम बिगरशेती जागेत असूनही त्या बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. मात्र, हॉटेल मालकाने ‘बिअरबार’ सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली नव्हती. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता, याबाबत ग्रामसभेत कोणताही ठराव न होता बार सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. हा बार बंद करण्याची मागणी ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबतची कागदपत्रेही ग्रामसभेपुढे मांडण्यात आली. ‘पाचवड गावात ‘शॉप अॅक्ट’ लागू होत नाही,’ असा दाखला ग्रामसेवकाने दिला. त्यामुळे बारला थेट परवानगी मिळाली असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, अजित शेवाळे यांनी केला. त्यावर ग्रामसेवक सुरेश बाबर म्हणाले, ‘ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असताना राज्य उत्पादन शुल्कचे वाई येथील दुय्यम निरीक्षकांनी २० नोव्हेंबर, २०१३ रोजी सायंकाळी घरी येऊन याबाबत आपला जवाब घेतला. वास्तविक त्यावेळी त्यांना कार्यालयात येऊन जबाब घ्या, असे सांगितले. पण, अधिकाऱ्यांनी ‘आम्हाला शिकवू नका, मी तुमच्या वरचा अधिकारी आहे,’ असे सांगून जबरदस्तीने जबाब नोंदविला. शॉप अॅक्ट लागू होत नाही, असा जबाब दिला आहे, याबाबत मी स्वत: कुठला दाखला दिला नाही.’‘संबंधित बारला परवानगी दिली नाही, उलट तो बार बेकायदा असून बंद करावा, अशीच विद्यमान पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे,’ अशी माहिती सरपंच संजय गायकवाड, सदस्य भरत गायकवाड, महेश गायकवाड यांनी मांडली. विद्यमान पदाधिकारी राजकारण बाजूला ठेवून विकास करत आहेत. गावापेक्षा कोणी मोठा नाही. गावात दारूबंदी झालीच पाहिजे,’ अशी मागणी शामराव गायकवाड यांनी केली. त्यावरुन काही काळ गोंधळ झाला. या गोंधळातच ग्रामसभा गुंडाळण्यात आली. याचवेळी विविध घोषणा दिल्या जात होत्या. (वार्ताहर)अधिकारी जबाबदार की ग्रामसेवक?‘एखाद्या बारसाठी अधिकारी ग्रामसेवकाच्या घरी जाऊन जबरदस्तीने जबाब घेत असल्यास त्याला ग्रामसेवक बळी पडत असेल तर याबाबत त्या अधिकाऱ्याला दोषी धरायचे की ग्रामसेवकाला?,’ असा प्रश्न शेवाळे व गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत हा बार बंद करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली.
परवानगी हॉटेलची, काढला बिअरबार
By admin | Published: January 27, 2015 10:37 PM