वाई :
महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रुजविणे आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साध्य करणे हा मुख्य उद्देश असतो, असे प्रतिपादन प्रा. देवानंद शिंगटे यांनी केले. किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व या विषयावर बोलत होते.
प्रा. शिंगटे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत उभारण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रामीण समाजाच्या विकासावर देशाची प्रगती अवलंबून आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील चांगले गुण फुलविण्याचे आणि वाईट विचार नाहीसे करण्याचे कार्य केले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधत असतो.
प्राचार्य डॉ. रमेश वैद्य म्हणाले, समाजसेवा हे खूप महान कार्य असून त्यातून मिळणारा आनंद मनाला समाधान देणारा असतो. आजच्या भरकटलेल्या पिढीसाठी राष्ट्रीय सेवा योजना अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी समाजातील दुःख व अन्याय निवारण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार करून देश उभारण्याच्या कार्यासाठी सज्ज करण्याचे महान कार्य या सेवा योजनेमार्फत केले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दोरके यांनी केले. प्रा. नितीन कस्तुरे यांनी स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. संयोगीता शिंदे यांनी आभार मानले तर प्रा. कु. स्नेहल पाटणे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्या निर्मला कणसे, पर्यवेक्षक विवेक सुपेकर, प्रा. बाळासाहेब कोकरे, प्रा. सचिन चव्हाण, प्रा. सतीश तावरे आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो - राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात बोलताना प्रा. देवानंद शिंगटे डावीकडून प्रा. संतोष दोरके, डॉ. रमेश वैद्य, प्रा. निर्मला कणसे, प्रा. विवेक सुपेकर - फोटो पांडुरंग भिलारे