शिरवळ : पेट्रोल-डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा टायर फुटल्यानंतर आग आगली. यामुळे शिरवळकरांनी मृत्यूचा थरार अनुभवला आहे. तब्बल २४ हजार लिटर पेट्रोल-डिझेल भरलेल्या टँकरला लागलेली आग भोर नगरपरिषद, शिरवळ एमआयडीसीतील एशियन पेन्ट्स व वाई नगरपरिषदेच्या अग्निशमनच्या जवानांनी तीन तासांत विझविली. टँकरचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवार, दि. १९ रोजी रात्री अकराच्या दरम्यान घडली.
शिरवळ पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, न्हावा-शेवा, मुंबई येथील रिलायन्स कंपनीच्या डेपोमधून गडहिंग्लज, कोल्हापूर याठिकाणी असणाऱ्या पेट्रोल पंपावर चालक शामसुंदर प्रभू कोल्हे (वय ३८ रा. लोणी काळभोर जि. पुणे ) व दुसरा चालक विलास भगवान मोरे (३३, रा. चांदणी जि. बीड) हे टँकर (एमएच १२ आरएन ६७७८) घेऊन निघाले होते. टँकरमध्ये १४ हजार लिटर डिझेल तर १० हजार लिटर पेट्रोल भरलेले होते. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ हद्दीमधील फुलमळ्यालगत टँकर आला असता क्लिनर बाजूकडील पाठीमागे असणारा टायर फुटला. चालक शामसुंदर याने टँकरवर नियंत्रण मिळवित साधारणपणे ७५ ते १०० मीटरपर्यंत ब्रेक दाबत टँकर थांबविला. फुटलेल्या टायरला आग लागली होती. यावेळी टँकरमधील आग विझविणाऱ्या यंत्रणेने चालक शामसुंदर कोल्हे याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग शेजारील सहा टायरला लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
याबाबतची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भोर नगर परिषदचे अग्निशमन बंब, केसुर्डी एमआयडीसीतील एशियन पेन्ट्सच्या अग्निशमन दल व वाईच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकरला लागलेली आग तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास विझविली. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते.
यावेळी दोन्ही बाजूकडे दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आग आटोक्यात आल्यानंतर सेवा रस्त्याने वाहने सोडून खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. चालक शामसुंदर कोल्हे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे तपास करीत आहेत.
चौकट
दोन किलोमीटरचा परिसर मोकळा
शिरवळ हद्दीत पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग लागल्याचे व टँकरमध्ये २४ हजार लिटर इंधन असल्याचे समजताच शिरवळ पोलिसांनी दोन किलोमीटर परिसरातील अपार्टमेंटमधील रहिवाशांसहित अवघ्या पंधरा मिनिटामध्ये परिसर मोकळा केला.
फोटो मेल आहे.
शिरवळ येथे पेट्रोल-डिझेल टँकरला सोमवारी मध्यरात्री लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणली. (छाया : मुराद पटेल )