कृषी उत्पन्न बाजार समितीने ऑनलाइन आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, मार्केट कमिटीचे सचिव शंकरराव सोनवलकर उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रयोगशील रहावे. एकेकाळी तालुक्यामध्ये ऊसाबरोबरच कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते. मध्यंतरी शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेण्याचे थांबविले होते. आता पुन्हा कापसाच्या पिकाकडे शेतकरी वळू लागला आहे. तालुक्यातील जमिनीचा पीएच व्हॅल्यू कापूस उत्पादनासाठी चांगला असल्यामुळे भविष्यामध्ये कापसाचे उत्पादन वाढणार आहे. हे लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारमान्य कापूस खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील रहावे.’
सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी वर्षभरामध्ये बाजार समितीने राबविलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचा तसेच कामकाजाचा आढावा घेतला. वार्षिक ठरावाचे वाचन सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले. यावेळी सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विनायकराव पाटील यांनी आभार मानले.