फलटण : गेले संपूर्ण वर्ष भय, काळजी, चिंता अशा कोरोनामय वातावरणाचे मळभ मनावर दाटले असताना ते दूर करण्यासाठी आता चैतन्यदायी गणेशोत्सवाची चाहूल फलटणकरांना लागली आहे. मराठी मनाला अपार ऊर्जा आणि उत्साह देणारा गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपल्याने नैराश्यदायी वातावरणाचा नूर पालटायला सुरुवात झाली असून, बाजारपेठेत पुन्हा चैतन्य पसरले आहे.
गणेशोत्सवाची चाहूल लागताच कोरोनाचे मळभ दूर होऊन आनंदी व उत्साही वातावरणाची प्रचिती येऊ लागली आहे. गणेशोत्सवाच्या आधीचा शेवटचा आठवडा म्हणजे विविध साहित्याने सजलेली आणि गर्दीने फुललेली बाजारपेठ असे समीकरण असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री होणार की नाही ही भीती खोटी ठरवत फलटणकर कोरोनामुळे आलेले नैराश्य झटकून गणरायाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. शंकर मार्केट, सुपर मार्केट, रविवार पेठेचा इतर भाग या बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
गणेशमूर्तीची नोंदणी आणि खरेदी तसेच मखर, फुले, दिव्यांच्या माळा, दिवे, कागदी व कापडी तोरण, हार, पूजेचे व प्रसादाचे साहित्य अशी खरेदी नागरिकांनी केली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, त्यांचा उत्साह दुणावला आहे. मनाला अपार उत्साह देणारा गणेशोत्सव एक दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशोत्सवासाठीची कामे करण्यासाठी नागरिक विश्वासाने बाहेर पडताना दिसत आहेत. नागरिकांना आता उत्साहाचे वेध लागले असून, उत्सवाच्या कामाला गती आली आहे. कोरोनासह जीवन जगताना कोरोनाला आता धैर्याने सामोरे जायचे आहे, अशीच जबरदस्त इच्छाशक्ती गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाणवू लागली आहे. गणेशोत्सवामुळे मिळणारी ऊर्जा कोरोनाशी लढताना उपयोगी पडणार आहे.