सातारा : फलटणचे नंदकुमार ननावरे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला ननावरे यांचे आत्महत्या प्रकरण फिरून फिरून फलटणमधील रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही नाईक निंबाळकर यांच्या राजकारणाभोवतीच फिरत आहे. उज्ज्वला ननावरे यांनी २०१५ मध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांविरोधात ॲट्रॉसिटीची केस दाखल केली होती. ती मागे घेणे आणि न घेणे यावरून ननावरे दाम्पत्यास त्रास दिला जात असल्याचा खुलासा धनंजय ननावरे यांच्या वकिलांनी सोमवारी न्यायालयात केल्याने या प्रकरणाला पुन्हा वेगळे वळण लागले आहे.फलटणच्या ननावरे दाम्पत्याने फलटण सोडले असले तरी या ठिकाणच्या अडचणी त्यांची पाठ सोडत नव्हत्या. मुंबईत जाऊनही फलटणमधील अडचणींनीच त्यांचा घात केला. नंदकुमार ननावरे यांच्या पत्नी उज्ज्वला ननावरे यांनी चार ते पाच रामराजे समर्थकांच्या विरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी ज्योती कलानी यांनी काही वर्षांपूर्वी मध्यस्थी केली होती. त्यानंतर उज्ज्वला ननावरे यांनी ही तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला.तर ही तक्रार मागे घेतली जाऊ नये यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ननावरे यांच्यावर दबाव आणल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यासाठी त्यांनी संग्राम निकाळजे यांना अंबरनाथला पाठविले होते. तिथे त्यांनी नंदकुमार ननावरे यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करून तक्रार मागे घेतली, तर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची विविध मार्गांनी धमकी दिल्याचेही वकिलांनी न्यायालयात सांगितले.उज्ज्वला ननावरे यांनी रामराजे समर्थकांविरोधातील खटला मागे न घेता त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावांचाही समावेश करावा, असा दबाव आणला जात होता, ही बाबही वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
उच्च न्यायालयातून खटला पुन्हा सुरू करण्यासाठी दबावॲट्रॉसिटीचा खटला मागे न घेता तो उच्च न्यायालयात अर्ज करून पुन्हा सुरू करण्याबाबत विनंती करण्यात यावी, असे ननावरे यांना सांगण्यात आले होते. खटला मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला होता. त्यामुळे आता हा खटला पुन्हा सुरू करण्यात यावा, असा अर्ज उच्च न्यायालयात करण्यात यावा, असे ननावरे यांना सांगितले जात होते. मात्र, त्यांनी यासाठी नकार दिल्यानंतर त्यांना त्रास देणे सुरू झाल्याचेही वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा खटलाहा खटला हाय प्रोफाइल झाल्याने आणि त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदारांचा समावेश असल्याने पोलिसांकडून नि:पक्षपाती चौकशी होईल, अशी खात्री नंदकुमार ननावरे यांचे भाऊ धनंजय ननावरे यांना नाही. त्यामुळे या खटल्याचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, अशी मागणी करण्यात यावी, अशी विनंती धनंजय ननावरे यांनी वकिलांद्वारे केली आहे.
नंदकुमार ननावरे यांचा मृत्यूपूर्वीच्या व्हिडीओत खुलासाज्यांच्यामुळे नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीला आत्महत्या करावी लागली त्यांच्या फारसे नादाला न लागता. झाला गेला प्रकार विसरून जाऊन मुलांनी आपले पुढील आयुष्य जगावे. कारण, त्यांच्याविरोधात तक्रारी करून काहीच होणार नाही, अशी हतबलताही नंदकुमार ननावरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी केलेल्या एका व्हिडीओमध्ये केली होती.