फलटण : फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करताना पूर्वीचे सर्वेक्षण व रेल्वेच्या ताब्यात असलेल्या या मार्गावरील जमिनींचा विचार प्राधान्याने करुन पूर्वीचा मार्ग कायम राहील, अशा पद्धतीने सर्वेक्षण करण्याबाबत स्पष्ट निर्देश सोलापूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी दिले आहेत.
विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक सारेश भाजपे, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला, श्याम कुलकर्णी, नजीब मुल्ला, श्री श्री निवास उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून रेंगाळलेला फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुमारे २ महिन्यांपूर्वी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटून या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्याप्रमाणे रेल्वेमंत्र्यांनी आदेश देऊन या मार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल तत्काळ मागविला आहे. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्याबाबत काही अडचणी आहेत काय? याची विचारणा गुरुवारी बैठकीत करण्यात आली.
जुना सर्वे झाल्याप्रमाणे रेल्वे गेली पाहिजे, अशी ठाम भूमिका खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी या बैठकीत आग्रहपूर्वक मांडली. पूर्वीच्या मार्गाव्यतिरिक्त नवीन रेल्वे मार्ग सर्वेक्षणामध्ये अनेक गावांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेकांची राहती घरे, शेतजमिनी बाधित होत आहेत. व्यावसायिकदृष्ट्या ही गोष्ट योग्य नसल्याची भूमिका घेत खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी जुन्या रेल्वे मार्गाला पाठिंबा देत त्याच मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करुन अहवाल त्वरित पाठविण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
फलटण - बारामती रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचे हस्तांतरण व जमिनीचा मोबदला याबाबत सविस्तर माहिती घेऊन सर्वांना योग्य मोबदला मिळेल, यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग जुन्या निर्धारित मार्गानेच करावा लागेल, असे सक्त आदेश रेल्वे विभागाला या बैठकीत देण्यात आले. प्रस्तावित असलेल्या हैद्राबाद - मुंबई बुलेट ट्रेन मार्गाबाबत या बैठकीत चर्चा झाली. फलटण - पुणे मार्गावर रेल्वे सेवा सुरु करणेबाबत काही अडचणी आहेत काय, असतील तर त्या तातडीने दूर करुन, या मार्गावर रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था तातडीने करावी. लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल व अन्य मान्यवरांच्या हस्ते फलटण - पुणे मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार नाईक - निंबाळकर यांनी सांगितले.
फोटो ०४फलटण-रेल्वे
पुणे येथे गुरुवारी झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, रेणू शर्मा यांनी फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग सर्वेक्षणाबाबत चर्चा केली.