फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, फलटण पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणा-या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. शुक्रवारी पोलिसांनी ६७ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई केली.
फलटण शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचे गांभीर्य नसणारे अनेक वाहनचालक बिनकामाचे दुचाकी व चारचाकी वाहनातून फिरत आहेत. यातील काहीजण तर विनामास्क फिरत आहेत. फलटण शहर आणि ग्रामीण पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत बेजबाबदार वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्यांना अत्यावश्यक कामे आहेत आणि ज्यांच्याकडे महत्त्वाचे कामाचे पुरावे आहेत, अशांना सोडून दिले जात आहेत. जे बिनकामाचे फिरत आहेत, त्यांची वाहने आठ दिवसांसाठी जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत ६७ वाहने जप्त करण्यात आली. या मोहिमेत फलटण शहर पोलीस ठाण्यातील ४ पोलीस अधिकारी, ३० पोलीस अंमलदार, १५ होमगार्ड नेमण्यात आले होते.
फोटो : ०६ नसील शिकलगार
फलटण पोलिसांनी शुक्रवारी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीचालकांच्या गाड्या जप्त केल्या. (छाया : नसीर शिकलगार)