फलटण : कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली फलटण ते पुणेरेल्वेसेवा गुरुवारपासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सुरू झाली आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे विस्कळीत झालेल्या एसटीच्या पार्श्वभूमी रेल्वे प्रशासनाने पुणे-फलटण रेल्वेसेवा पुन्हा सुरू केल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.मागील वर्षी कोरोना काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत होती. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून एसटी सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे सेवा तातडीने सुरु करण्याचा आग्रह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे धरला होता. त्याप्रमाणे दि. १० पासून फलटण-पुणे, पुणे-फलटण तसेच फलटण-लोणंद, लोणंद-फलटण अशी रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये गाडी ०१५३५ पुणे येथून पहाटे ०५.५० वाजता सुटेल व ०९.३५ वाजता फलटणला पोहोचेल. परतीचा प्रवास गाडी ०१५३६ फलटण येथून सहा वाजता सुटेल व पुणे येथे रात्री ७ वाजून ३५ मिनीटांनी पोहोचेल. ही गाडी सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद स्टेशनवर थांबेल.गाडी ०१५३८ फलटण येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल व दुपारी १२.२० वाजता लोणंदला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी ०१५३७ लोणंद येथून दुपारी तीन वाजता सुटेल व फलटण येथे सायंकाळी ४ वाजून २० मिनीटांणी पोहोचेल ही गाडी सुरवडी स्टेशनवर थांबेल. दहा कोच असलेल्या डेमू रेल्वे गाडी ही रविवारी वगळता प्रतिदिन सेवेत असेल.
मागील वर्षी कोरोना काळात बंद झालेली फलटण-पुणे रेल्वे सेवा रेल्वेमंत्र्याकडे आणि रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केल्याने पुन्हा सुरू झाली आहे. लवकरच फलटण ते मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार