फलटण : फलटण परिसर व तालुक्यातील सर्व व्यापारी शेतकऱ्यांना फलटण-पुणे रेल्वे सेवेचा फायदा होणार आहे. त्यामुळे रेल्वे सुरू होणे आवश्यक असल्याची बाब खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्र्यांनी पुढील महिन्यात फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरू करून त्याच्या उद्घाटनाला येणार असल्याचे सांगितले,’ अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
या शिष्टमंडळात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राहुल कुल, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा समावेश होता.
शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, फलटण–लोणंद रेल्वेची चाचणी एक वर्षापूर्वी सुरू झाली. काही अडचणी आहेत का? याबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महिन्यामध्ये फलटण येथे रेल्वेचे प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फलटण-पुणे रेल्वे दररोज सुरू व्हावी यासाठी भूमिका घेतली. फलटण-पुणे रेल्वे सुरू झाल्यास रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. फलटण, माण, खटाव, माळशिरस या तालुक्यातील शेतकऱ्यांचा पुण्याकडे जाणारा शेतीमाल रेल्वेच्या माध्यमातून जाऊ शकतो, हे निदर्शनास आणून दिले.
अनेक मुले-मुली पुणे येथे शिक्षणासाठी राहत असून फलटण-पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यास त्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. भविष्यामध्ये फलटण हे औद्योगिक कॉरिडॉर सेंटर होईल. पुणे येथून फलटणकडे येणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. त्यांना या रेल्वेचा लाभ घेता येईल व रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकेल. फलटण परिसरातील तालुक्यातील सर्व व्यापारी यांनाही या रेल्वे सेवेचा फायदा होणार असून फलटण-पुणे रेल्वे सुरू होणे आवश्यक असल्याची बाब अधिकारी व रेल्वे मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.