फलटण : गाईच्या दुधाला किमान पंचवीस रुपये दर व दहा रुपये प्रति लिटर याप्रमाणे अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, दुधाला भाव द्यावा या मागणीसाठी शनिवारी फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये भाजप व मित्र पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला.भाजपा नेते व फलटण नगर पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी चौकात मोठ्या प्रमाणात भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामू विरकर, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, जयकुमार शिंदे, अनिकेत कदम, भाजपा शहराध्यक्ष उदय मांढरे, अभिजीत नाईक-निंबाळकर, सुशांत निंबाळकर, संजय पवार, बजरंग गावडे, अशोकराव भोसले, उषा राऊत, राहुल शहा, रासपचे जिल्हा संपर्कप्रमुख खंडेराव सरक, काशिनाथ शेवते, संतोष ठोंबरे, रमेश चव्हाण उपस्थित होते.याप्रसंगी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असताना, सर्व उद्योग, व्यवसाय बंद असताना शेतकऱ्यांनी दूध उत्पादन करून सर्वांना दूध पोहोचले. त्यांच्या दुधाला दर मिळत नसून राज्य सरकारकडे दूध दरवाढीसंदर्भात वारंवार मागणी करूनही सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
गायीच्या दुधाला किमान पंचवीस रुपये दर व दहा रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे अन्यथा यापुढील काळातही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी गोरगरिबांना दुधाचे वाटप करण्यात आले