फलटण (सातारा) : शेळ्या, मेंढ्यांची दुपट किंमतीने खरेदी करण्याचे अमिश दाखवून खरेदीच्या बदल्यात रोख रक्कम न देता, बोगस चेक देऊन, शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी योगेश पोपट येळे व त्याच्या इतर साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व शेतकºयांचे जबाब नोंदवून फिर्यादी दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात जबाब नोंदवून फिर्याद घेण्याचे काम चालू आहे.
मलवडी, खडकी, घाडगेवाडी, मिरगाव, आदर्की, जावळी, मिरढे, वाघोशी, पाडळी, लोणंद, सालपे, हिंगणगाव अशा फलटण व खंडाळा या दोन तालुक्यातील शेतकºयांच्या हजारो बकरी, शेळ्या, मेंढ्या व कोकरू यांची दीड वर्षांपासून योगेश पोपट येळे (रा. खुंटे ता. फलटण) याने तालुक्यातील अनेक भागात पाहुणे असल्याचे सांगून व विविध बँकांचे धनादेश देऊन खरेदी केल्या.
हे धनादेश बेअरर स्वरूपात दिले. ‘फक्त तुम्हाला विश्वास म्हणून हे धनादेश देतोय मी तुम्हाला केलेल्या तारखेला रोख पैसे आणून देतो,’ असे ते प्रत्येक शेतकºयांना सांगत. काही जणांना नोटरी करून तर काहींना पुढील तारखेचा धनादेश देऊन येळे याने व्यवहार केले. मात्र प्रत्यक्षात कोणालाच धनादेशद्वारे रक्कम मिळाली नाही. काही धनादेश बाऊन्स झाले तर काही तारखा उलटून गेल्यामुळे बाद झाले. सरासरी एक मेंढीची किंमत बारा हजार रुपये लावून येळे याने मेंढ्या खरेदी केल्या.
खंडाळा, बारामती, माण, कोरेगाव या भागात देखील येळे याने धनगर समाजाकडून अशीच फसवणूक केली असल्याचे पीडित व्यक्तींनी सांगितले.