शिडीद्वारे प्रवासी बाहेर ; फलटण तालुक्यात चोवीस तासांतील दुसरा अपघात
लोकमत न्यूज नेटेवर्क
फलटण : धावत्या एसटीच्या स्टिअरिंगमध्ये बिघाड निर्माण झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने मंगळवारी चौधरवाडीजवळ साखरवाडी-जिंती-फलटण एसटी बस कालव्यात जाऊन पडली. यामध्ये चोवीस प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. चालक-वाहकांनी शिडीचा वापर करून बाहेर काढले.
तालुक्यातील राजाळे येथे एसटी पलटी होऊन चाळीस प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असताना चोवीस तासांत एसटीला हा दुसरा अपघात झाला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराची साखरवाडी-जिंती-फलटण ही बस (एमएच १२ बीटी १२२२) मंगळवारी दुपारी चौधरवाडी येथील पाटनेवाडी रेल्वे फाटा येथे आली असता चालकाचा ताबा सुटल्याने ती कालव्यात जाऊन पलटी झाली. चालक व वाहकांनी सर्व प्रवाशांना शिडीच्या साह्याने बाहेर काढले. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थही धावून आले. त्यांनी जखमींना दुसºया वाहनांतून फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी उपचार करून किरकोळ जखमींना सोडून दिले.