फलटण तालुक्यात दररोज तीनशेच्या सरासरीने रुग्ण आढळत असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या तर वेगळीच आहे. कोरोनाबाधित रुग्णांना फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय आणि दिवंगत हिंदूराव नाईक निंबाळकर कोरोना सेंटर येथे संपूर्ण मोफत उपचार मिळत असून, शहरातील इतर खाजगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. काही खाजगी रुग्णालयांमध्ये अवाच्या सव्वा भाडे आकारले जात असून, रुग्णालयाचे एकाचे बिल एक ते अडीच लाख रुपयांपर्यंत जात आहे.
शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्यास सांगितले असताना त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे खाजगी रुग्णालयाकडून केली जात नाही. एखादा कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला ५० हजार ते १ लाख रुपये सुरुवातीला डिपॉझिट म्हणून भरावे लागतात, जर त्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज लागली, तर त्याला ते इंजेक्शन महागड्या दरामध्ये खरेदी करावी लागत असून, शासकीय दरामध्ये खूपच कमी रुग्णांना इंजेक्शन मिळाले आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी पकडली असली तरी अनेक महत्त्वाच्या खाजगी रुग्णालयात महागडी इंजेक्शन विकली गेली तरी त्याची चौकशी किंवा कारवाई प्रशासनाने केलेली नाही. खाजगी रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही खाजगी रुग्णालयांची सखोल चौकशी प्रामाणिकपणे झाली, तर त्यांनी रुग्णांची केलेली लूटमार बाहेर येण्याची शक्यता आहे.
फलटणमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून, खाजगी हॉस्पिटल कमी पडत असल्याने सातारा किंवा बारामती येथील सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये बरेचसे रुग्ण उपचार घेत आहेत. फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय, दिवंगत हिंदूराव नाईक निंबाळकर कोरोना सेंटर, श्री स्वामी समर्थ, फलटण कोरोना सेंटर, दत्त फाउंडेशन कोरोना केअर सेंटर, साखरवाडी, समाज कल्याण हॉस्टेल, जाधववाडी, सजाई गार्डन, फलटण येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून, शहरातील नऊ खाजगी रुग्णालयांमध्ये पैसे घेऊन उपचार केले जात आहेत. फलटण तालुक्यात एकूण ६४१ बेडची सोय असून, त्यामध्ये ऑक्सिजन बेड २८२, तर व्हेंटिलेटर बेड १७ आहेत. २५४ विलगीकरण बेड (सर्वसाधारण) बेडची संख्या आहे.
फलटण तालुक्यात आतापर्यंत एकूण १८,५०० रुग्ण कोरोनाबाधित आले असून, सरकारी आकडेवारीप्रमाणे २५३ रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी मृत्यू झालेल्यांची संख्या ६०० हून अधिक आहे.